विशेष वृत्तांत: पालघर जिल्ह्यातील कोरोना योद्ध्यांना सलाम..!

0
407

पालघर – योगेश चांदेकर:

कोरोना व्हायरसने जगात थैमान घातले आहे. महासत्ता असणारा अमेरिका हा देश देखील कोरोनापुढे हतबल झाल्याचे दिसत आहे. जगातील क्रमांक दोनची आरोग्य यंत्रणा असताना इटली या देशात तर हाहाकार माजला आहे. भारतामध्ये याचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने केलेल्या सुरवातीच्या उपाययोजनांबाबत जागतिक आरोग्य संघटनेने समाधान व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र सरकारने देखील विशेष पावलं उचलत अनेक खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. राज्यात ३० कोविड(कोरोना) रुग्णालय जाहीर करण्यात आली आहेत.

सरकारच्या या सर्व प्रयत्नांमध्ये कोरोना संशयित व बाधितांवर उपचार करण्यामध्ये निश्चितच मुख्य भूमिका डॉक्टर, नर्सेस, केमिस्ट, पॅथॉलॉजी कर्मचारी यांसह इतर सर्व आरोग्य कर्मचारी यांची आहे. मात्र त्यांच्या खांद्याला खांदा लावून कोरोनाचा समूह संसर्ग होऊ नये यासाठी अहोरात्र काम करणारे जिल्हा परिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, नगर पंचायत प्रशासन, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रा पं सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका, पेट्रोलपंप कर्मचारी, औषध निर्मिती कारखान्यांमध्ये काम करणारे कामगार, महावितरण कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी, फळ-भाजी वितरक, गरजुंना अन्नपुरवठा करणाऱ्या सामाजिक संस्था, गरजुंना अन्नधान्य वाटप करणारे सामाजिक कार्यकर्ते असे एक नाही तर अनेक पडद्यामागील कोरोना योद्ध्ये संकटकाळी देशसेवाच करत आहेत. वरील सर्व आणि ज्यांचा अनावधानाने अथवा नजरचुकीने इथे उल्लेख झाला नाही अशा सर्व कोरोना योद्ध्यांना मुंबई ई न्यूजचा सलाम..!

पोलीस प्रशासन:
२३ पोलीस स्टेशन, हेड क्वार्टर, विविध अधिकाऱ्यांची कार्यालये यामध्ये १७० वरिष्ठ अधिकारी व २८०० पोलीस कर्मचारी सध्या कार्यरत आहेत.

ग्रामीण रुग्णालय विभाग:
१२ ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी 30, तज्ज्ञ डॉक्टर 19, वैद्यकीय अधीक्षक – 5, BAMS डॉक्टर 2, IPHS – 14, GNM नर्सेस -113, ANM (RBSK) नर्सेस – 32 इतके कर्मचारी सध्या कार्यरत आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्र विभाग:
पालघर जिल्ह्यातील ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह, ३२४ आरोग्य उपकेंद्रांमधील कर्मचारी कार्यरत आहेत. १ जिल्हा आरोग्य अधिकारी, ८ तालुका आरोग्य अधिकारी, ११० मेडिकल ऑफिसर, ५५० GNM व ANM कर्मचारी, २२०० आशा वर्कर सध्या कार्यरत आहेत. जवळ जवळ सर्वच कर्मचारी हे वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे कर्तव्य बजावत आहेत.

ग्रामपंचायत विभाग आणि अंगणवाडी:
४७३ ग्रामपंचायत असून ४१९ -ग्रामविकास अधिकारी – ग्रामसेवक, ४७३ सरपंच, ४७३ उपसरपंच, ४५० पोलीस पाटील यांच्यासह हजारो ग्रामपंचायत कर्मचारी कार्यरत आहेत. मिनी अंगणवाडी आणि अंगणवाडी अशा मिळून ३००० अंगणवाडी सेविका आहेत या अंगणवाडी सेविकांसह त्यांच्या मदतनीसही याकामे प्रशासनाला सहकार्य करत आहेत.

प्रशासन व इतर असे सर्व मिळून हजारोंच्या संख्येने काम करणारे लोक हे आपल्या कुटुंबापासून काही अंशी अलिप्त राहून काम करत आहेत ते फक्त आणि फक्त कोरोनाला रोखण्यासाठी. या सर्वांची एकच अपेक्षा आहे ती आपल्या सहकार्याची, आपण आप-आपल्या घरात राहण्याची, त्यामुळे अत्यावश्यक काम नसताना घरातून बाहेर पडण्याअगोदर एकदा त्यांचा विचार करा. ते त्यांच्या कुटुंबापासून दूर आहेत फक्त ‘आपलं पालघर कुटुंब’ सुरक्षित रहावं म्हणून..! कारण हे कोरोनाशी असलेलं युद्ध आपल्याला जिंकायचं आहे म्हणून..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here