‘पधारो म्हारो देस’; डहाणू – जयपूर विशेष रेल्वेने १२०३ कामगारांची जयपूरला रवानगी..!

0
582

पालघर-योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यात संचारबंदीमुळे अडकलेले राजस्थान जयपूरच्या १२०३ लोकांना डहाणू रेल्वे स्थानकाहुन एका विशेष रेल्वेने जयपूरसाठी रवाना झाले. सर्व प्रवाशांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते. राजस्थानकडे पायी चालत जात असणाऱ्या प्रवाशांना डहाणू, बोईसर, तवा, कासा, खुटल, तलासरी, वाडा, पालघर या भागात प्रशासनाने उभारलेल्या तात्पुरत्या निवारा कॅम्पमध्ये ते राहत होते. आज या प्रवाशांना बसने डहाणू येथे आणण्यात आले. तेथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर विशेष रेल्वेद्वारे त्यांची रवानगी करण्यात आली.

दुसरा लॉक डाऊन संपण्याअगोदरच तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढविण्यात आल्याने घरी जाण्याची आस लावून बसलेले परराज्यातील नागरिक काही अंशी नाराज झाले होते. राजस्थानी कामगारांसह रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूूूरांना घराची ओढ लागली होती. त्यामुळे या परप्रांतीय कामगारांसाठी डहाणू रोड रेल्वे स्टेशन ते जयपूर या रेल्वे मार्गावर विशेष रेल्वेगाडी रेल्वे प्रशासनाकडून सोडण्याचे नियोजन करण्यात आले. स्थानिक अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्तात सुमारे १२०३ राजस्थानी कामगार या रेल्वेद्वारे रवाना झाले.

यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी खासदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे, सहाय्यक जिल्हाधिकारी सौरभ कटीयार, तालुका आरोग्य अधिकारी संदीप गाढेकर, रेल्वेचे बलसाड विभाग व्यवस्थापकीय अधिकारी अनू त्यागी, स्टेशन प्रबंधक राकेश चंद्र शर्मा, रेल्वे पोलीस अधिकारी बसंत राय,उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार धर्माधिकारी, नगराध्यक्ष भरत राजपूत, जगदीश राजपूत आदींसह मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here