MUMBAIeNEWS Network:
सोशल डिस्टनिंग पाळण्याबरोबरच एका वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत या अटीवर मद्यविक्री सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मद्यविक्री बंदीमुळे रोज मद्य घेणाऱ्यांची मोठी अडचण झाली होती. लोकडाऊनच्या सुरुवातीला चोरीने आणि अधिक पैसे मोजून काही दिवस दारू घेतली पण, स्टॉक संपल्याने आणि पोलिसांच्या कारवाईने तळीराम दारू विक्री केंव्हा सुरु होईल या प्रतीक्षेत होते. दोन लॉकडाऊननंतर आता तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये मात्र तळिरामांना दिलासा मिळाला आहे. दारूविक्रीस परवानगी दिल्याने सरकारच्या तिजोरीत कराच्या रुपानेही भर पडणार आहे. अनेक राज्यांनी दारू विक्रीस परवानगी देण्याची मागणी केंद्राकडे केली होती.

केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाऊनची मुदत दोन आठवडे वाढवितानाच ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये दारू विक्रीला परवानगी दिल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे रेड झोनमधील तळिरामांमध्ये काहीशी निराशा होती. त्यानंतर पुन्हा तिन्ही झोनमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने काल रात्री दारूविक्रीची परवानगी दिली. मात्र महाराष्ट्र सरकारने त्याआधीच एक आदेश काढून रेड झोन आणि कंटेटमेंट झोनमध्ये दारूविक्रीला मनाई केली होती. अखेर त्यावरील गोंधळ राज्य सरकारने संपवला. रेड झोनमध्ये आणि पालिका क्षेत्रातही (कंटेटमेंट वगळता) दारूविक्रीला परवानगी देण्यात आली आाहे.