पालघर: मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाला त्या शिक्षकाकडून हरताळ..!

0
404

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील शिक्षक हे नियुक्तीच्या ठिकाणी काम न करता जिल्ह्याच्या कामासाठी कार्यरत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘मुंबई ई न्यूज’ने उघडकीस आणताच खळबळ उडाली होती. संबधित बातमीची गंभीरतेने दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु करून ‘त्या’ शिक्षकांना नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ हजर राहण्याचे आदेश दिले.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळाबाह्य काम करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई व्हावी अथवा त्यांना शाळेत हजर राहण्याचे आदेश द्यावेत. आणि यासंबंधी प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशा स्वरूपाची तीव्र मागणी पालकवर्गातून करण्यात येत होती. या प्रकरणाची दखल घेत, शिक्षकांनी शाळाबाह्य काम करणे, स्वतःच्या नियमबाह्य बदल्या करून घेणे, बदल्यांमध्ये आर्थिक हितसंबंध जपून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करणे अशा प्रकारची वृत्तमालिकाच ‘मुंबई ई न्यूज’चे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांनी प्रकाशित केली होती. याचा इम्पॅक्ट म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन यांनी, या बातमीत तथ्य आढळल्याने कोणत्याही राजकीय दबाव न जुमानता शाळाबाह्य काम करणाऱ्या शिक्षकांना नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ हजर राहण्याचे आदेश दिले.

मात्र अजूनही एक शिक्षक नियुक्तीच्या ठिकाणी हजर न राहता डहाणू पंचायत समिती येथे कार्यरत आहे तसेच या शिक्षकाला डहाणू गटशिक्षण अधिकाऱ्याचा वरदहस्त असल्याचे समजते. त्यामुळे या प्रकरणात शिक्षक आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी वरिष्ठांनी याप्रकरणी लक्ष घालण्याची गरज आहे. संबंधित अधिकारी आणि शिक्षकावर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक वर्गातून जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here