पालघर – योगेश चांदेकर :
पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे व महाराष्ट्राचे उद्योग मंत्री मा.ना. सुभाष देसाई यांनी आज तारापुर, ता. बोईसर, जि. पालघर येथील औद्योगिक वसाहतीतील स्फोट झालेल्या ए. एन.के. फार्मासिटीकल्स कंपनीच्या घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.
तारापुर, ता. बोईसर, जि. पालघर येथील औद्योगिक वसाहतीतील ए.एन.के. फार्मासिटीकल्स कंपनीत झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जण जखमी झाले आहेत. जखमींवर तुंगा हॉस्पिटल येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. भुसे यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी करीत बचाव कार्याचा आढावा घेतला. यावेळी आ.श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी शिंदे, पोलिस अधीक्षक गौरव सिंग, उपविभागीय अधिकारी विकास गजरे, तहसीलदार शिंदे यांच्यासह वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. त्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी येथील तुंगा रुग्णालयात जावून जखमींची चौकशी केली. यावेळी बोलताना पालकमंत्री भुसे यांनी सांगितले, या घटनेची सविस्तर माहिती मुख्यमंत्री महोदयांना देण्यात आली आहे.

सदर घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक व स्थानिक नागरिकांनी मदत व बचाव कार्य करीत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. जखमींवर शासकीय खर्चाने औषधोपचार करण्यात येतील व मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना रु.5 लाखाची मदत मुख्यमंत्री महोदय यांनी जाहीर केली आहे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी याठिकाणी खा. मा. राजेंद्र गावित, जिल्हा संपर्क प्रमुख मा. आ. रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी मा. शिंदे, जिल्हाप्रमुख वसंत भाई चव्हाण व शिवसेनेचे विविध पदाधीकारी व विवीध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.