जनधन खातेधारक महिलांच्या बचत खात्यावर ‘इतकी’ रक्कम जमा!

0
451

मुंबई:
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली आर्थिक व सामाजिक परिस्थिती लक्षात घेता केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत देशातील प्रधानमंत्री जनधन खातेधारक असलेल्या सर्व महिलांच्या बचत खात्यावर एप्रिल ते जून २०२० पर्यत तीन महिन्यासाठी प्रती माह ५०० रुपये प्रमाणे प्रत्येकी एकूण रक्कम १ हजार ५०० रुपये जमा करण्यात येणार आहे. यानुसार माहे एप्रिल २०२० ची आर्थिक रक्कम प्रधानमंत्री जनधन खातेधारक असलेल्या महिलांच्या बचत खात्यावर जमा करण्यात आली आहे. तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या पहिल्या हप्त्याची रक्कम २ हजार रुपये थेट हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्यात येणार आहे. उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर. विमला यांनी ही माहिती दिली.

कोरोना विषाणूचा प्रसार होणार नाही याची खबरदारी म्हणून केंद्र शासनाने सर्व बँक शाखा, बँक ग्राहक सेवा केंद्र, बीसी पॉईंट, एटीएम इत्यादी ठिकाणी गर्दी होऊ नये याकरीता या योजनेची रक्कम काढण्यासाठी जनधन खाते क्रमांकाच्या शेवटचा एक अंकनिहाय तारीख ठरवून दिली आहे. त्यानुसार या बचत खात्यातून त्या त्या दिवशी किंवा ९ एप्रिल २०२० नंतर केव्हाही (सुट्टीचा वार वगळून) पैसे काढता येणार आहेत. स्वयंसहायता समुहातील महिला सदस्यांनी व इतर महिलांनी गर्दी न करता आपल्या आवश्यकतेनुसार पैसे काढावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

खातेधारक महिलेच्या जनधन खाते क्रमांकाच्या शेवटच्या अंकाप्रमाणे रक्कम काढण्यासाठी पुढील प्रमाणे तारखा देण्यात आल्या आहेत. खाते क्रमांकातील शेवटचा अंक ० ते १ (३ एप्रिल), २ ते ३ (४ एप्रिल), ४ ते ५ (७ एप्रिल), ६ ते ७ (८ एप्रिल), ८ ते ९ (९ एप्रिल).

उमेद अभियानस्तरावरुन सर्व महिलांना या योजनेविषयी गावस्तरावर माहिती देण्यात येत असून जागरुक करण्यात येत आहे. यासाठी अभियानाअंतर्गत निवड केलेल्या ४ हजार ५०० बँक सखी, आर्थिक साक्षरता सखी तसेच इतर सखी यांची याबाबत मदत घेण्यात येत आहे. तसेच व्यवसाय प्रतिनिधीच्या सहाय्याने गरोदर, आजारी, अपंग व वृद्ध महिलांना थेट घरपोच रक्कम अदा करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

कोरोना विषाणुचा प्रसार होणार नाही याची खबरदारी म्हणून समुहातील सदस्य महिला आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहेत. तसेच याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे, अशी माहिती श्रीमती आर. विमला यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here