पालघर – योगेश चांदेकर :
ग्रामीण भागातील लेखकांच्या व साहित्यीकांच्या साहित्याला हक्काचे विचारपीठ मिळण्याच्या उद्देशाने वाड्यासारख्या ग्रामीण भागामध्ये १३ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ज्ञानदा प्रकाशन या संस्थेने व तर त्या माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या ज्ञानार्जन या साप्ताहिकाने दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या दिवशी यशस्वीरित्या १३ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने ज्ञानदा प्रकाशन व ज्ञानार्जन साप्ताहिकाचा १३ वा वर्धापनदिन तसेच छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन वाडा येथे पां.जा.हायस्कुलच्या मैदानावर करण्यात आले होते.
या संस्थांच्या वतीने दरवर्षी ठाणे आणि पालघर जिल्ह्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो. यावर्षीही ज्ञानदा प्रकाशन व छत्रपती प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यामध्ये छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामीण भागात उत्कृष्ट पत्रकारिता करणारे डहाणू येथील दै. पुण्यनगरी व वृत्तमानसचे या वृत्तपत्रांचे व एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे पालघर प्रतिनिधी संतोष रामचंद्र पाटील यांना स्व. राम बा. पाटील स्मृती आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राम बा. पाटील यांचे सुपूत्र व ज्ञानदा प्रकाशनचे संचालक डॉ. विवेक पाटील यांजकडून रु. ५००० चा धनादेश तसेच छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याबरोबरच आदर्श युवा पत्रकार म्हणून पुढारी, प्रहार, वृत्तमानस या दैनिकांचे वाडा प्रतिनिधी सचिन विलास भोईर यांचा आदर्श युवा पत्रकार म्हणून गौरव करण्यात आला.
याबरोबरच महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार अरविंद कृष्णा ठाकरे (सहशिक्षक छत्रपती विद्यालय, साखरे, ता. विक्रमगड), सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार सौ. विनिता विलास मुकणे (जि.प.शाळा तळ्याचापाडा), आदर्श खेळाडू पुरस्कार कु. काजल विजय सावंत (कुस्तीपटू), आदर्श कलावंत पुरस्कार मेघन ठाकरे (कलाशिक्षक, लिटील एंजल्स इंग्लिश मिडीयम स्कुल, वाडा) यांना प्रदान करुन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी ज्ञानार्जन साप्ताहिकाच्या १४ व्या वर्षातील पहिल्या अंकाचे तसेच ज्ञानदा प्रकाशनने प्रकाशित केलेल्या लेखक राजेंद्र आगिवले लिखित माझा पिक गाव, प्रभाकर शिरसाठ (औरंगाबाद) लिखित इंदूप्रभा या कविता संग्रहाचे तर योगेश गोतारणे यांनी लिहिलेल्या श्री शिवक्षेत्र वाडा तालुका या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

या भव्य सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, पालघर जि. प. च्या अध्यक्षा भारतीताई कामडी, उपाध्यक्ष निलेशजी सांबरे, वाडा पंचायत समिती सभापती योगेश गवा, उपसभापती जगदीश पाटील, शब्द मशालचे संपादक शरद पाटील, जि. प. सदस्य नरेशजी आकरे, शशिकांत पाटील, ज्ञानेश्वर (शिवा) सांबरे, अक्षदा चौधरी, माजी जि. प. उपाध्यक्ष निलेशजी गंधे, कुणबी सेना पालघर जिल्हा प्रमुख प्रफुल्ल (काका) पाटील, भिवंडी विधानसभा शिवसेना संपर्कप्रमुख धनंजय पष्टे, जेष्ठ शिवसेना नेते अरुण पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिलजी पाटील, कुणबी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदय पाटील, सामाजिक कार्यकर्ते विलास आकरे, अशोक गव्हाळे, वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा गितांजली कोलेकर, उपनगराध्यक्षा विशाखा पाटील, विक्रमगड उपनगराध्यक्ष निलेश( पिन्का) पडवळे, पंचायत समिती सदस्य अमोल पाटील, सागर ठाकरे, सौ. कार्तिका ठाकरे, माजी पंचायत समिती सभापती अश्विनी शेळके, माजी पंचायत समिती सदस्य अरुण अधिकारी, वाडा नगरपंचायतीच्या, पाणीपुरवठा सभापती उर्मिलाताई पाटील, विकास व नियोजन सभापती नयनाताई चौधरी, माजी उपनगराध्यक्ष भारतीताई सपाटे, नगरसेवक प्रकाश केणे, राम जाधव, शिवसेना उपजिल्हा संघटक संगिता ठाकरे, माजी उपसभापती एकनाथ वेखंडे, मराठा सेवा संघाचे कोकण विभाग अध्यक्ष नितीन मोकाशी, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, मनसे वाडा तालुका अध्यक्ष कांती ठाकरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रोहिदास पाटील, कुणबी सेना वाडा तालुका अध्यक्ष प्रल्हाद शिंदे, राष्ट्रवादी वाडा शहर अध्यक्ष अमिन सेंदू, शिवसेना शहरप्रमुख नरेश चौधरी, शिवसेना उपतालुकाप्रमुख कैलास सोनटक्के, चर्मोद्योग कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष भरत गायकवाड, कोकण कामगार विकास मंचचे सरचिटणीस महेंद्र ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते रंजन पाटील, वंचित बहुजन आघाडीचे आतिष जाधव, सामाजिक कार्यकर्त्या अंजली चौधरी, मोनिका गवळी यांजबरोबर विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिवजयंती निमित्त जगद्गुरु तुकोबाराय एक क्रांतीकारी योद्धा या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील, माजी जि. प. उपाध्यक्ष निलेश गंधे, संपादक शरद पाटील यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. त्यामध्ये मान्यवरांनी छत्रपती प्रतिष्ठान, ज्ञानदा प्रकाशन व ज्ञानार्जनच्या कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष व संपादक युवराज ठाकरे यांनी केले. सूत्रसंचालन राजेश पाटील यांनी केले तर आभार सहसंपादक व छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ऋषिकेश सावंत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संपादकीय मंडळ व छत्रपती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.