पालघर: रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकरी प्रकरण; ‘या’ आरोपींचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले

0
457

पालघर – योगेश चांदेकर:

रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकरी लुबाडणूक प्रकरणातील चार आरोपींचे जामीन अर्ज पालघर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळले. या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या पाच आरोपीं पैकी चार आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. यातील एका आरोपीला कोरोनाची लागण झाल्याने सर्वच आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. सध्या हे आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्याने चार जणांनी जामीनासाठी अर्ज केला होता.

दरम्यान यापूर्वी मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर या सर्व आरोपींचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते. सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव यामुळे तपासासाठी येत असलेल्या मर्यादा, गुन्ह्याची एकूण व्याप्ती व स्वरूप आणि आरोपींच्या समर्थकांनी अन्यायग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांना दिलेल्या धमक्या या पार्श्वभूमीवर चार आरोपींचा जामीन अर्ज फेटाळल्याची माहिती आहे. नारायण कान्हा डबके(रा. कोंडगाव), रुपेश पांडुरंग पाटील, दोषीराम कमळाकर घाटाळ, जानू रामा मोर या चार आरोपींचा जामीन अर्ज पालघर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

सदर प्रकरणाची अधिक माहिती अशी, रिलायन्स इथेन गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांना दमदाटी करून नुकसान भरपाई पोटी मिळालेल्या मोबदल्यातील ३५ टक्के रक्कम जबरदस्तीने वसूल केल्याप्रकरणी आत्तापर्यंत एकूण १० आरोपींची नावे समोर आली आहेत. यातील पाच आरोपी अटकेत असून निलेश गणपत पाटील, गणेश किसन आडगा, प्रकाश हरसन तांबडा, विनायक दामा कोदे, गोविंद जेठ्या हरपाले हे फरार आहेत.

अटकेतील आरोपी मधुकर सखाराम काकरा यानी जामिनासाठी केलेला अर्ज आणि फरार आरोपी गणेश किसन आडगा याचा अटकपूर्व जामीन अर्ज प्रलंबित असून यावर सोमवारी( २० जुलै) सुनावणी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here