पालघर: शिक्षकाच्या सेवा पुस्तकाला फुटले पाय.. दोन महिने आले फिरून..!

0
407

पालघर – योगेश चांदेकर:

शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला असून यामुळे शिक्षण विभागातील अधिकारी आणि शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. डहाणू तालुक्यातील निकणे कातकरी पाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाने त्याचे सेवा पुस्तकचं काही महिन्यांपासून गायब केले होते, त्याचा शिक्षण विभागाला काहीच थांगपत्ता लागला नाही. सेवा पुस्तकांतील नोंदीनुसार शिक्षकांचे कामांचे मूल्यांकन होऊन त्यांचा पगार होणे अपेक्षित असते. मात्र या शिक्षकाचा आता निघत असलेला पगार कोणत्या मूल्यांकनानुसार निघत आहे हा सवालच आहे.

मुंबई ई न्यूजच्या हाती आलेल्या माहितीनुसार या शिक्षकाने त्याचे शिक्षण विभागाकडील मूळ सेवा पुस्तक २०१९ मध्येच घरी घेऊन गेला होता. असे असले तरीही या शिक्षकाचा दर महिन्याचा पगार सहाव्या वेतन आयोगानुसार निघत असल्याचे खात्रीलायकरित्या दिसत आहे. एकीकडे राज्यातील शिक्षकांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार निघत असताना या शिक्षकास सातवा वेतन आयोग सेवा पुस्तक न मिळाल्यामुळे लागू झाला नाही. सदर शिक्षकाने सेवापुस्तक परस्पर कसे लांबविले? त्या शिक्षकाने सेवा पुस्तक घरी नेण्याचा उद्देश काय होता? सेवा पुस्तकात फायदेशीर नोंदी तर केल्या नाहीत ना? सेवा पुस्तक बाहेर नेण्याकामी त्या शिक्षकाला कोणी मदत केली? स्वतःहूनच त्याने हे सेवा पुस्तक पळवले तर नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

एका शिक्षकाचे सेवा पुस्तक दोन-दोन महिन्यांसाठी गायब झाले असताना त्याबाबत कोणतीही तक्रार नोंदविल्याचे दिसत नाही. गट शिक्षण अधिकारी अथवा संबंधित विभागातील कोणत्याच अधिकाऱ्याने त्या शिक्षकाचे सेवा पुस्तक मिळत नसल्याबाबत तक्रार नोंदवली नाही. अथवा शिक्षकाने ते परत आणून दिल्यानंतर त्याच्यावर कारवाई देखील केली नाही. दरम्यान संबंधित शिक्षकाने स्वतःची चूक मान्य करत सेवा पुस्तक परत जमा केले त्यावेळी शिक्षकाच्या उद्देशाविषयी अथवा सेवा पुस्तकामध्ये काही अनपेक्षित नोंदी तर केल्या गेल्या नाहीत ना याची देखील खातरजमा केली गेली नाही असे समजते. त्यामुळे या प्रकरणात शिक्षकाबरोबरच संबंधित शिक्षण विभाग देखील तितकाच जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणात सदर शिक्षकाकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता या शिक्षकाने सेवा पुस्तक २ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी घरी आणले होते असे सांगत उद्देशाबाबत विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच फक्त एक पगार सातव्या वेतन आयोगानुसार मिळाला असल्याचे सांगितले आहे.

वरकरणी हे प्रकरण साधारण वाटत असले तरी शिक्षकाच्या उद्देशाविषयी शंका निर्माण होते. तसेच भविष्यात जिल्ह्यात अन्यत्र अशा घटना घडू नये यासाठी या प्रकरणाची शिक्षण विभागाने गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here