पालघर-योगेश चांदेकर :

डहाणू तालुक्यातील चिंचणी गावातील नागेश्वरी पाड्यावर कातकरी कुटुंबातील मजूरांना मारहाण केल्याची घटना घडली. त्यातील विजय व दिनेश या मजूरांना मारहाण करत गाडीत डांबून अपहरण करण्यात आले. श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पुढील पावलं उचलून या मजुरांची सुटका तर केलीच पण घरात घुसून हैदोस घालणाऱ्या आणि महिलांचा विनयभंग करणाऱ्या मालक दिनेश तरे यांच्याविरोधात अपहरण, अट्रोसिटी, वेठबिगार प्रतिबंधक कायदा आणि विनयभंग असा गुन्हा दाखल करत जेरबंद करण्यात आले. दिनेश तरे हा भिवंडी तालुक्यातील गाणे फिरींगपाडा या गावचा आहे.

रविवारी रात्री डहाणू तालुक्यातील चिंचणी गावातील नागेश्वरी पाड्यावर ही घटना घडली. कासा वाघाडी येथील कातकरी समाजाचे दहा-बारा कुटुंब आपला उदरनिर्वाह करण्यासाठी तंबू बांधून चिंचणी नागेश्वरी पाड्यावर राहतात. ते भिवंडी मधील गाणे गावात वीटभट्टीवर काम करत. वीटभट्टी मालक दिनेश तरे याने या कुटूंबाला तीन वर्षापूर्वी रेखा सवरा हीच्या कुटुंबाला 13 हजार रुपये बयाणा दिला होता. दिले होते म्हणून त्या रात्री दहा वाजता तरे आणि त्यांच्या साथीदारांनी घराचा (तंबूचा) दरवाजा बळजबरीने उघडून,रेखा व तिचे दोन भाऊ व आई ह्यांना मारहाण करून , केसाला धरून अंगावरचे लुगडं सोडूनरेखाचा भाऊ विजय वाघात आणि दिनेश वाघात यांना जबरदस्तीने गाडीत भरून भिवंडी येथील नाणे गावात अपहरण करून नेण्यात आले. ही गोष्ट श्रमाजीवी संघटनेचे महिला कार्यकर्ती संध्या रावते व नयना दुबळा यांना कळल्यावर त्यांनी लगेच वानगाव येथील जिल्हा उपाध्यक्ष रवि चौधरी, तालुका महिला सचिव सुनीता गडग याना सांगितली लगेचच त्यांनी सोबत तालुका उपाध्यक्ष जीतू पाटील, इमान शेख, परवेश शेख, सोहेल शेख, हनिष सूतार, मूनाफ शेख, दुर्वेश दुबळा, संदेश कामडी, दिपक राऊत, सरोज चौधरी यांच्यासह घटनास्थळी जाऊन माहिती घेऊन लगेच चिंचणी पोलिस स्टेशन येथे पिडीत कुटुंबाला नेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश पगारे यांना याबाबत माहिती देत फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तातडीने सूत्र हलवत अपहरण झालेल्या मजुरांची सुटका करत आरोपीला बेड्या ठोकल्या.

कारकर्त्यांच्या तत्परतेचे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी कौतुक करत श्रमजीवच्या सर्व कार्यकर्त्यांचेही अभिनंदन केले. वेठबिगार प्रथा ही आपल्या समाजाला लागलेली कीड आहे, आजार आहे. या आजारावर सर्वांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीच्या भावनेने उपचार करणे आवश्यक आहे असे मत विवेक पंडित यांनी व्यक्त केले. आरोपीला तात्काळ जेरबंद करून पीडितांना दिलासा दिल्यामुळे पोलिसांचेही पंडित यांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here