पालघर-योगेश चांदेकर :

पालघर- सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाने विधी विद्यार्थ्यासाठी एका आठवड्याच्या विशेष अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. हा अभ्यास दौरा दि.४ जानेवारी ते ११ जानेवारी २०२० दरम्यान संपन्न झाला. या विशेष दौऱ्याची सुरूवात जालीयनवाला बागेतील ऐतिहासिक घटनेच्या स्मारकाला वंदन करून करण्यात आली. तदनंतर भारत-पाक अटारी सिमेवर भारतीय लष्करामार्फत आयोजित विविध कार्यक्रमांमधे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

पंजाब प्रातांतील ऐतिहासिक घटनांची नांदी आणि प्रखर देशभक्ती यांचा सुरेख संगम अनुभवत विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. तदनंतर अभ्यास दौऱ्याच्या मुख्य टप्प्यात विद्यार्थ्यांनी देशाच्या अत्यंत महत्वांच्या आस्थापना, विभाग आणि संस्थांना भेटी दिल्या. देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील प्रत्यक्ष कामकाज अनुभवणे हे या दौऱ्याचे मुख्य उद्दीष्ट होते. ऐतिहासिक वास्तू, कोर्ट रूम, न्यायदान प्रक्रिया, विस्तृत वाचनालय, बार रुम इत्यादी बाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे सेक्रेटरी आणि लेखक अॅड.अशोक अरोरा यांनी विद्यार्थ्यांची विशेष भेट घेतली. भेटीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला. या भेटीत अॅड‌. अशोक अरोरा यांनी महाविद्यालयाला काही विशेष पुस्तकांची भेट दिली. तसेच सर्वोच्च न्यायालयातील मान्यवरामार्फत महाविद्यालयाला भेट देऊन विद्यार्थांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.

अभ्यास दौऱ्यात पुढे राष्ट्रीय हरित न्यायालयातील कामकाज आणि कार्यपद्धती बाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे राष्ट्रीय कंपनी लाॅ ट्रिब्युनल या आस्थापनेत प्रत्यक्ष जाऊन कामकाज पाहणे, कार्यपद्धती समजुन घेणे तसेच तज्ञामार्फत आयोजित कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध आंतरराष्ट्रीय संस्था जसे वर्ल्ड वाईंल्डलाईफ फंड, यु.एन सारख्या आस्थापनांमध्ये जाऊन परिसंवाद साधला.

भारताचे नियत्रंक व महालेखापाल(CAG) या स्वायत्त संस्थेचे कामकाज, कार्यपद्धती आणि संरचना बाबत विशेष लेक्चरचे आयोजन करण्यात आले होते. सदर आस्थापनेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. या विशेष अभ्यास दौऱ्याचे आयोजन सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.पायल चोलेरा व प्रोफेसर अॅड. विनोद गुप्ता यांनी केले होते. सदर अभ्यास दौऱ्यात महाविद्यालयाच्या ३५ विधी विद्यार्थांनी सहभाग घेतला होता.
विविध विभागांना प्रत्यक्ष भेटी देणे, कामकाज अनुभवणे तसेच सखोल मार्गदर्शन यामुळे आम्हा विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली असे विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच अभ्यास दौऱ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून दौऱ्याची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here