Corona Effect Palghar – म्हणून ‘या’ शिक्षकाचे लोक करत आहेत विशेष कौतुक!

0
387

पालघर। (योगेश चांदेकर) कोरोनामुळे बोर्डी येथे दहावीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा गैरसमज झाला आणि तो दहावीचा पेपरच देण्यासाठी परिक्षा केंद्रावरच गेला नाही. ही बाब शिक्षकांच्या लक्षात आल्याने त्यांनी विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये यासाठी थेट त्याचे घर गाठले आणि सदर विद्यार्थ्यास  आपल्या दुचाकीवरून परिक्षा केंद्रावर आणून पेपर द्यायला लावला. शिक्षकांनी दाखवलेली ही तत्परता आणि विद्यार्थ्याप्रती असलेली तळमळ पाहून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

याबाबतीत अधिक माहिती अशी,सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व शाळा व महाविद्यालये तात्पुरत्या स्वरूपात बंद  करण्यात आली आहेत. मात्र दहावी,  बारावीच्या परीक्षा सूरू असल्याने त्या सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी सु.पे. ह. हायस्कूल बोर्डी येथे दहावीचे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी ध्रुव धनसुख दुबळा (रा.रामपूर) याचा गैरसमज झाल्याने तो पेपर देण्यासाठी बोर्डी येथील परीक्षा केंद्रावर गेलाच नाही.

सदर विद्यार्थी गैरहजर असल्याचे निदर्शनास येताच बोर्डी सु.पे. ह. शाळेचे शिक्षक श्री. वजु दळवी यांनी विद्यार्थ्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्याचे घर गाठले. विद्यार्थी गैरहजर असताना स्वतः विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्यास स्वतः च्या गाडीवर घेऊन परिक्षा केंद्रावर आणले आणि परीक्षेत बसू दिले. यामुळे विद्यार्थ्याचे भविष्यातील होणारे मोठे नुकसान टळले.

त्यांच्या या कृतीमुळे संपूर्ण रामपुर ग्रामस्थांनी आभार मानले. मागील वर्षी सुद्धा असाच एक विद्यार्थी आर्थिक परिस्थिती अभावी परीक्षेस गैरहजर असल्याचे पाहून त्यांनी स्वतः पालकांची समजूत काढत विद्यार्थ्यास दहावीच्या परीक्षेत बसवले.  तो विद्यार्थी चांगल्या मार्कने पास सुद्धा झाला. तशीच मोलाची कामगिरी याही वर्षी दळवी यांनी केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here