पालघर: 200 किलोमीटर अंतर पायी चालत गाठले गाव!

0
426

पालघर – योगेश चांदेकर:

बुधवारी दुपारी गुजरात राज्यातील नवसारी ते पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाणगाव हे 200 किलोमीटर अंतर 8 खलाशांनी पायी चालत मुळगाव गाठले. उंबरगाव ते वाणगाव हे अंतर रेल्वे लाईन वरून चालत त्यांनी 2 दिवसांत पार केले. चालून चालून पायाला अक्षरशः फोड येऊन फुटले पण चालणे थांबले नाही. लॉकडाऊन संपल्यावर गावी यायचे ठरवून ते इतके दिवस तेथेच थांबले होते मात्र जवळचे पैसे संपल्याने त्यांनी चालत येण्याचा निर्णय घेतला.

वाणगावचे उपसरपंच ब्रिजेश ठाकुर यांना सदर खलाशी चालत येत आहेत अशी माहीती मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांसह त्यांनी रेल्वे स्टेशनला धाव घेतली. त्या सर्व खलाशांची ग्रामीण रुग्णालय वाणगाव येथे आरोग्य तपासाणी केली, त्यांना करोनाची लक्षणे दिसत नसले तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईन होण्यास सांगितले.

एकाखोलीच्या घरात होम क्वारंटाईन कसे पाळणार हा प्रश्न उपस्थित झाला. तसेच गावातील लोक त्यांना ठेवायला तयार नव्हते त्यामुळे ग्रामपंचायतीला मोठा प्रश्न पडला होता. याप्रश्नी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आनंद भाई ठाकुर, उपसभापती पिंटु गहला, सरपंच संतोष ढाक, उपसरपंच ब्रिजेश ठाकुर, ग्रामसेवक विपिन पिंपळे व सत्यम ठाकुर यांच्या प्रयत्नाने सर्वमान्य तोडगा काढण्यात आला. त्या 8 खलाशांना जि प शाळा वाणगाव येथे क्वारंटाईन करण्यात आले.

त्यावेळी त्यांना जेवण बनवण्यासाठी शाळेतीलच गॅस शेगडी व सिलेंडर देण्यात आले. तसेच सत्यम ठाकुर यांनी त्यांना जेवण बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची व्यवस्था केली आहे. शेकडो किलोमीटर अंतर पायी चालत आल्यानंतर देखील त्यांनी घरी जाण्याचा हट्ट न धरता दाखवलेली प्रगल्भता नक्कीच कौतुकास्पद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here