‘यामुळे’ कोरोना विरुद्धच्या लढ्याला मिळणार बळ! – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0
405

मुंबई – योगेश चांदेकर:

कोरोनाबाधितांची तपासणी हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून आता आपल्याला रॅपिड टेस्टिंगसाठी मान्यता मिळाली आहे. या टेस्टिंगच्या माध्यमातून ५ मिनिटाच्या आत कोरोना तपासणीचा रिझल्ट कळू शकणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली. ‘यामुळे’ कोरोना विरुद्धच्या लढ्याला बळ मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी व उपस्थित पत्रकारांनी सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळले.

आज मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हीडीयो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली. बैठकीत कोरोनाच्या तपासणीवर सर्वाधिक भर देण्यात आला. ज्याठिकाणी पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत त्याठिकाणी ड्रोनसारख्या डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करण्याची सूचना पंतप्रधानांनी यावेळी केल्याचे राजेश टोपे म्हणाले. राज्यात डेडिकेटेड हॉस्पिटल असावेत असा आग्रहदेखील पंतप्रधानांनी यावेळी केला.. याची तयारी राज्य सरकारने केल्याचे त्यांनी सांगितले. जिथे रुग्णांची संख्या वाढत आहे तिथे कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. यात कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यात येणार नाही. जमावबंदीसारख्या अनेक गोष्टींची कडक अंमलबजावणी करण्यात येईल असेही, त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाशी अविरत लढा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जीवाशी आम्ही खेळणार नाही. त्यांना जास्तीत जास्त मेडीकल कीट्स उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पीपीईचं उत्पादन वाढविण्याचं काम आपण करत आहोत, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. पुढील परिस्थिती नेमकी काय असेल याचा अंदाज सध्या आपल्याला नाही. परंतु, त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण सक्षम असणं अत्यंत गरजेचं आहे. यासाठी ऑनलाईन मॉडेल तयार केल्याकडेही आरोग्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. यातून आशा वर्कर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.

अन्य राज्यातील कामगारवर्गाचीही आपण काळजी घेत आहोत. सव्वातीन लाख लोकांच्या राहण्याची, खाण्याची व वैद्यकीय व्यवस्था केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आरोग्याच्या दृष्टीनं सी आणि डी जीवनसत्व वाढवण्याकडे भर द्यावा लागेल, यासाठी आयुष या आपल्या विभागाकडून अनेक उपाययोजना केल्या जात असल्याचे राजेश टोपे म्हणाले.

विविध प्रकारच्या बाजारात मोठी गर्दी होऊ नये याची काळजी राज्य सरकारकडून घेण्यात येईल. हजरत निजामुद्दीन इथं जो मोठा कार्यक्रम झाला त्यात आपल्या राज्यातील १४०० बांधव उपस्थित होते. त्यांचा शोध घेण्याची प्रक्रीया सुरू झाल्याचेही टोपे म्हणाले.

राज्य शासनाला सध्या आर्थिक चणचण भासत आहे. केंद्राकडून १६ हजार कोटी येणे बाकी आहे. इतर राज्यांप्रमाणे मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील ही थकबाकी मिळावी, अशी मागणी केल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here