पालघर: वडापाव विक्रेत्यासह दोघांना जि. प. कृषि सभापती सुशिल चुरी यांच्याकडून मारहाण..!

0
401

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर तालुक्यातील बोईसर येथील कुडण याठिकाणी वडापाव विक्रेत्याला मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे कृषि व पशु संवर्धन सभापती सुशिल चुरी यांच्यासह तिघांविरोधात तारापुर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. मंगळवार (२८ जुलै) रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास सदर मारहाण करण्यात आल्याची तक्रार देण्यात आली आहे. सुनील बापू चुरी (वय ५१ रा.कुडण नवापाडा) व त्यांच्या दोन मुलांना मारहाण करण्यात
आली. यामध्ये हिमांशू सुनील चुरी याला मारहाणी दरम्यान डोक्याला मार लागल्याने त्यास उपचारासाठी बोईसर येथील तुंगा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती फिर्यादीने दिली आहे.

सुनील चुरी यांची कुडण येथे वडापावची गाडी असून ते १९९८ सालापासून वडापावची गाडी चालवतात. सुनील चुरी ज्या ठिकाणी वडापावची गाडी चालवतात, त्याठिकाणी जिल्हा परिषदेचे कृषि व पशु संवर्धन सभापती सुशिल चुरी यांचा भाऊ नितेश उर्फ पिंटू चुरी आणि कुणाल (पूर्ण नाव समजू शकलेले नाही) यांनी चारचाकी गाडी पार्क केली अशी तक्रार देण्यात आली आहे. याबाबत सुनील चुरी यांनी “वडापावच्या गाडीच्या जागी चारचाकी लावली तर मी गाडी कशी लावणार. आपण दुसऱ्या ठिकाणी गाडी लावली तर बरे होईल.” अशी विनंतीवजा विचारणा केली असता सुनील चुरी व त्यांच्या मुलांना मारहाण केली. पुन्हा याठिकाणी गाडी लावल्यास बघून घेऊ अशी धमकीही दिली. “सुनील चुरी यांनी तारापूर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली असून चौकशी सुरु आहे, यामध्ये कोणी दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल” अशी माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक संतोष जाधव यांनी दिली आहे. याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे कृषि व पशु संवर्धन सभापती सुशिल चुरी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

गरिबाला वाली नाही का?

सुनील चुरी हे १९९८ सालापासून वडापावचा व्यवसाय करतात. त्यांच्या आर्थिक कमाईचे एकमेव साधन वडापावची गाडी असून त्यावर त्यांचे घर चालत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. एका मोठ्या राजकीय पदावर असणाऱ्या व्यक्तीने अशा पध्दतीने कायदा हातात घेत केलेली मारहाण चुकीची असून यामुळे अशा लोकप्रतिनिधींना कायद्याचा धाकच उरला नसल्याची चर्चा नागरिकांमधून सुरू आहे. त्यामुळे दिवसाढवळ्या अशी गुंडागर्दी करून सर्वसामान्यांमध्ये दहशत पसरवणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी नागरिकांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here