पालघर – योगेश चांदेकर :
बोईसर एस टी आगारात पालघरच्या दिशेने जाण्याऱ्या बस थांबावर निवारा शेड नसल्याने प्रवाशांना उन्हात ताटकळत उभे राहावे लागत असल्याने प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. प्रवाशांनी वारंवार एस टी प्रशासनाकडे सांगूनही यावर निवारा शेड संदर्भात काहीही केले जात नव्हते. एसटीतुन प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांना ऊन असो की पावसाळा त्यांना गैरसोयीने प्रवास करावा लागत होता. कित्येक वेळा तर प्रवासी चक्कर येऊन पडल्याच्या घटनाही घडल्या होत्या.
बऱ्याच वेळेला तक्रार करून सुद्धा हा प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने घेतलेला नाही, त्यामुळे सदर बाबीची तक्रार कळताच शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते तसेच महाराष्ट्र एस टी कामगार सेनेच्या पालघर विभागाचे प्रमुख सल्लागार कुंदन संखे यांनी बोईसर एस टी आगार येथे भेट देऊन प्रवाशांकडून विषय समजून घेतला तसेच तात्काळ एस टी आगारात नसलेले आगारप्रमुख सुनील शिंदे यांना बोलावून घेऊन लगेचच निवारा शेड उभे करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यास सांगितले. त्यावेळी संखे यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरल. आता सरकार सुद्धा आपलच आहे त्यामुळे जी काही मदत लागेल ती देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत त्यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर सुटला पाहिजे.

तसेच तेथूनच पालघर विभागाचे विभाग नियंत्रक गायकवाड यांच्याशी संवाद साधून सदर बाबीची अंमलबजावणी करण्यात यावी असे सांगितले. त्यावर नियंत्रक गायकवाड यांनी यावर लगेच बैठक घेऊन निवारा शेड उभी करू असे आश्वासन दिले. त्यानंतर संखे यांनी प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत शेडचा प्रश्न लवकरात लवकर सोडवू असे आश्वासन दिले.
वास्तविक आज एस टी सेवा डबघाईला आली असतांना तसेच अधिकाधिक लोकाभिमुख सेवा देणे गरजेचे असतांना प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, परंतु निवारा शेड नसल्याने होण्याऱ्या गैरसोईबाबत कुंदन संखे यांनी पुढाकार घेतल्याने एस टी प्रवाशांनी त्यांचे आभार मानले.