पालघर: रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकरी प्रकरण; एकूण ६१ शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार..!

0
348

पालघर – योगेश चांदेकर:

रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांना लुबाडल्या प्रकरणी फरार असलेल्या पाच आरोपींपैकी एका आरोपीला अटक झाल्यानंतर आज एकूण २४ शेतकऱ्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे आरोपींविरोधात तक्रार दिली आहे. नुकसानभरपाई रक्कमेपैकी ३५% रक्कम लुबाडणुक केल्याप्रकरणी दहा आरोपींपैकी आत्तापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. रविवारी डहाणू तालुक्यातील १७ शेतकऱ्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे आपली लुबाडणूक झाल्याबाबत जबाब नोंदविला. त्यानंतर आज २४ शेतकऱ्यांनी जबरदस्तीने पैसे वसूल केल्याबाबतची तक्रार दिली आहे.

दरम्यान आत्तापर्यंत या प्रकरणात एकूण ६१ बाधित शेतकऱ्यांनी आरोपींविरोधात तक्रार नोंदविली आहे. आंदोलनाच्या जोरावर व शेतकऱ्यांच्या एकजुटीने रिलायन्सला वाढीव मोबदला देण्यास भाग पडले. त्यामुळे गरीब आदिवासी शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा उचलत जबरदस्तीने पैसे वसूल करणारे लोक सामाजिक कार्यकर्ते कसले? अन पैसे लुबाडून समाजकार्य घडते का? असा प्रश्न बाधित शेतकरी व त्यांच्या मुलांमधून पुढे येत आहे. शेतकऱ्यांची जागृत झालेल्या सुज्ञ मुलांना आपल्या अज्ञानाचा काही लोक गैरफायदा घेत असल्याचं समजले आहे. त्यामुळे आजवर ज्यांनी लुबाडणूक केली त्यांच्या अन्यायाला न जुमानता बाधित शेतकरी पुढे येणार असल्याचा विश्वास काही शेतकरी पुत्रांनी बोलून दाखविला.

एकीकडे मुंबई ई न्यूज बाधित शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करत असताना काही ठराविक पत्रकार व सुज्ञ मंडळी आरोपींच समर्थन करत असल्याबद्दल शेतकरी पुत्रांनी नाराजी व्यक्त केली. “काही दिवसांपूर्वी जबाब नोंदविलेल्या शेतकऱ्यांना धमकाविण्याचे काम आरोपींच्या समर्थकांकडून केलं जात होत त्याला यापुढे शेतकरी जुमानणार नाहीत. आपल्या हक्काचे पैसे लुबाडले गेले आहेत याची जाणीव आम्हाला झाली असून बहुसंख्येने अन्यायग्रस्त शेतकरी तक्रार करण्यासाठी पुढे येतील” असे मत एका तक्रारदार शेतकऱ्याने व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here