पालघर: साधू हत्याकांड प्रकरणी मोठी कारवाई; ३५ पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली

0
437

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गडचिंचले आदिवासी पाडा येथे १६ एप्रिल रोजी दोन साधू व त्यांचा वाहन चालक यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे व पोलीस उपनिरीक्षक सुधीर काटारे यांच्यावर कामात कचुराई केल्याचा ठपका ठेवून पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी निलंबनाची कारवाई केली होती. मंगळवारी याच प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी कासा पोलीस ठाणे येथे कार्यरत असणाऱ्या ३५ पोलीस कर्मचाऱ्यांची देखील कामात कचुराई केल्याचा ठपका ठेवत तडकाफडकी बदली केली आहे.

अफवांमुळे चोर असल्याच्या गैरसमजातून गडचिंचले गावासह आजूबाजूच्या पाडा व गावातील 400 ते 500 लोकांच्या जमावाने तिघांची हत्या केली होती. या घटनेच्या दुसऱ्या दिवशीच पोलिसांकडून ११० जणांना अटक करण्यात आली होती. यात 9 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यानंतर कासा पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांसह एका पोलीस उप निरीक्षकास तात्काळ निलंबित केल्यानंतर, आज दि. २८ एप्रिल रोजी कासा पोलीस स्टेशनच्या ३५ कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यातंर्गत बदल्या, पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी केल्या आहेत. दरम्यान इतर फरार आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखा व इतर पोलीस दल ड्रोनच्या माध्यमातून घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here