पालघर- योगेश चांदेकर :
पालघर जिल्ह्यात डहाणू शेजारी वाढवण येथे प्रमुख बंदर उभारण्यास आज केंद्रीय मंत्रिमंडळाने तत्वत: मंजुरी  दिली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या  केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ‘भू स्वामीत्व प्रारुपाच्या’ (लँड लॉर्ड मॉडेल) धर्तीवर वाढवण बंदर विकसित करण्यात येणार असून  या  प्रकल्पासाठी  एकूण खर्च 65, 544.54 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

असे उभारले जाणार वाढवण बंदर

वाढवण बंदर उभारण्यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) 50% किंवा त्याहून अधिक समभाग (इक्विटी) भागीदारीसह  स्पेशल पर्पज व्हेईकलची स्थापना करण्यात येणार आहे. स्पेशल पर्पज व्हेईकलच्या माध्यमातून बंदरासाठी  पायाभूत सुविधा विकसित करण्यात येणार. तसेच, नियोजित जागी  भराव टाकून जमीन समतल करणे,  ब्रेक वॉटरचे बांधकाम तसेच किनाऱ्याच्या मागील भागात संपर्क सुविधा उभारणे इत्यादींचा यात समावेश राहील. खाजगी विकासकांकडून सार्वजनिक-खासगी भागीदारीतून  व्यवसाय संबंधित कामे पार पडतील .

वाढवण बंदराच्या विकासामुळे जगातील अव्वल 10 कंटेनर बंदर असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश होणार आहे. राज्यात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथे भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असून या बंदराच्या माध्यमातून महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, तेलंगणा राज्यांच्या किनाऱ्यालगतचा भाग आणि गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र( एनसीआर), पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मालवाहतूक होते. जेएनपीटी  बंदरावर कंटेनरची देखभाल घेण्यासाठी विशेष बंदराची गरज लक्षात घेता वाढवण बंदर उभारण्यात येत आहे.
वाढवण बंदराच्या किनाऱ्याजवळ सुमारे 20 मीटरचा नैसर्गिक भूप्रदेश असून याचा उपयोग करून बंदरावर मोठ्या जहाजांना हाताळणे शक्य होणार आहे. वाढवण बंदराच्या विकासामुळे 16,000 ते 25,000 टीईयू क्षमतेच्या कंटेनर जहाजांना हाताळणे शक्य होईल. परिणामी अर्थव्यवस्थेला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि वाहतुकीचा खर्च कमी होईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here