डहाणू प्रतिनिधी – जितेंद्र पाटील:

तौक्ते चक्रीवादळ पालघर जिल्ह्यातही सक्रिय झाले असून रविवारपासून सर्व डहाणू तालुक्यात कमी-अधिक फरकाने पावसाने हजेरी लावली. त्यातच पावसाबरोबर जोरदार वारा असल्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडल्याने नुकसान झाले.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी विद्युत खांब पडल्याचे तसेच विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला.

डहाणू तालुक्यात वरोती गावात विजेचाचा पोल पडल्याने खबरदारी म्हणून वीज पुरवठा खंडित ठेवण्यात आला आहे. तसेच गंजाड, कासा, चारोटी, दाभोन या भागात तांत्रिक बिघाड होऊन डहाणू तालुक्यातील ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. विद्युत वाहिनीवर वेती गावाजवळ झाड पडल्याने वीजपुरवठा खंडित राहण्याचा प्रकार घडला होता.

पालघर महावितरण विभागात एकूण ९३ वीज वाहिन्या मध्ये तांत्रिक बिघाड होऊन १ लाख ९८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. पाऊस व वाऱ्यामुळे झाडे वीज वाहिन्या वर पडून आज महावितरण चे लघु दाब वाहिनीचे ४९ पोलचे, उच्च दाब वहिनीचे १९ पोलचे व १ रोहित्र केंद्राचे नुकसान झाले आहे. वीजपुरवठा खंडित झालेल्या ९३ विजवाहिन्या पैकी ५५ विजवाहिन्याचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. ३८ विजवाहिन्याचा व १२ उपकेंद्राचा वीज पुरवठा युद्ध पातळीवर सुरू करण्याचे काम सुरू आहे. पाऊस व वाऱ्यामुळे कामात अडचणी निर्माण होत असल्याची माहिती पालघर महावितरणकडून देण्यात आली आहे.

खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी मा. मुख्य अभियंता कल्याण, पालघर येथे ठाण मांडून परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत. सदर वीजपुरवठा पूर्ववत करणेसाठी महावितरणचे कर्मचारी, अधिकारी यांचे सोबत जादाचे ठेकेदारांचे कर्मचारी काम करत असून या नैसर्गिक आपत्तीत ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन पालघर महावितरण अधीक्षक अभियंता किरण नागावकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here