पालघर: स्पाइनवुडची अवैध वाहतूक; वन परिक्षेत्र अधिकाऱ्याची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात..!

0
11508

पालघर – योगेश चांदेकर:

गुजरातमधील अंकलेश्वर येथून मुंबईच्या दिशेने स्पाइनवुडची वाहतूक करत असलेल्या कंटेनर ट्रेलरला २३ एप्रिल रोजी रात्री ९.३० ते १० च्या सुमारास डहाणू तालुक्यातील चारोटी टोल नाक्याच्या पुढे पोलीसांसोबत बंदोबस्तास असणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अडविले होते. सदर ट्रेलरमध्ये २५ ते ३० घन मीटर स्पाईनवुड लाकडाची वाहतूक करण्यात येत असल्याचे लक्षात आल्याने ड्रॉयव्हरकडे वाहतूक परवाना मागण्यात आला. मात्र ट्रेलर ड्रॉयव्हरकडे महाराष्ट्रामध्ये स्पाइनवुडची वाहतुक करण्यास असणारी कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसल्याने तो ट्रेलर वन परिक्षेत्र कासा येथे आणण्यात आला होता. वन कर्मचाऱ्यांनी याघटनेबाबतची सर्व माहिती कासा येथील वन परिक्षेत्र अधिकारी एस एस पाटील यांना दिली होती.

वन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहन चालकावर वन गुन्हा दाखल करून दंड वसूल करून त्याला पुढील प्रवासासाठी पास अदा करणे अथवा स्पाईन वुडच्या अवैध वाहतुकीसंबंधी कारवाईसाठी ताब्यात ठेवणे गरजेचे होते. असे असताना वन परिक्षेत्र अधिकारी एस एस पाटील यांनी कोणतीही कारवाई न करता सदर वाहन गुजरातच्या दिशेने परत पाठवले असल्याचे समोर आले आहे. याबाबत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लॉक डाऊनमुळे काही चौक्या बंद असल्याचे थातुर मातुर उत्तर दिले. तसेच डहाणू येथील सहाय्यक वनसंरक्षक मराठे यांच्या आदेशावरून सदर वाहनांस गुजरातच्या दिशेने परत पाठविल्याचे सांगितले. मुंबई ई न्यूजने सदर गोष्ट विजय भिसे, उप वनरक्षक डहाणू यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी लॉक डाऊनमुळे कोणतीही चौकी बंद ठेवण्याचे आदेश दिले नसल्याचे स्पष्ट केले. कासा येथील हि घटना गंभीर आहे त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

दरम्यान गुजरात राज्यातून महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत प्रवेश करत असताना या वाहनास का अडविण्यात आले नाही? या वाहनावर वन कायद्याचे उल्लंघन केल्याची कारवाई का करण्यात आली नाही? वाहनाला पुढील वाहतुकीस परवाना न देता अथवा चौकशीसाठी ताब्यात न ठेवता परत गुजरातच्या दिशेने का पाठवले? असे प्रश्न काही जागरूक नागरिकांमधून विचारले जात आहेत. याप्रश्नी सहाय्यक वनसंरक्षकांनी नेमकी याप्रकारची भूमिका का घेतली? हे देखील समोर येणे गरजेचे आहे.

“सदर घटनेची संपूर्ण माहिती घेत आहे. या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल.” – विजय भिसे, उपवन संरक्षक डहाणू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here