लॉक डाउन काळात ‘असंघटित’ कामगारांना नुकसान भरपाई द्या, विवेक पंडित यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
394

पालघर/जव्हार – योगेश चांदेकर। कोरोना बाबत परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी लॉकडाउन सारखे कठोर उपाय आवश्यक असतील तर राज्यातील ज्या असंघटित कामगारांचे हातावर पोट आहे, अशा कामगारांना सरकारने विनाविलंब नुकसान भरपाई द्यावी अन्यथा भूक बळींचा सामना करावा लागेल असे मत श्रमजीवी संघटना संस्थापक तथा राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी आज जव्हार येथे व्यक्त केले. कोरोना विषाणू नियंत्रणात आणण्याबाबत शासनाकडून सुरू असलेले काम कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

जे कामगार संघटित क्षेत्रात काम करतात त्या कामगारांना, सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टीचा पगार मिळणार असल्याने त्यांना जगण्यासाठी चिंता नाही, परंतु बांधकाम कामगार, शेतमजुर, हमाल, माथाडी, छोट्या उद्योगातील कंत्राटी कामगार, घरकाम करणाऱ्या महिला, देह विक्रय करणाऱ्या महिला यांच्या वर उपासमारीची वेळ येईल. आणि नवे संकट शासनासमोर उभे राहील. अनिश्चित काळ लॉक डाउन झाल्यास, असे भुकेले लोक रस्त्यावर उतरतील, आणि परिस्थिती स्फोटक बनू शकेल. ग्रामीण भागातील रोजगार हमीचे कामही न काढल्यास त्यांनाही नुकसान भरपाई देऊन जगवावे लागणार आहे.

या शिवाय जे कंत्राटी कामगार सफाई चे काम करीत आहेत त्यांच्या आरोग्य सुरक्षेची हमी त्यांना द्यावी लागणार आहे. त्यांना आवश्यक ते सुरक्षा उपकरण, सामुग्री उपलब्ध करून द्यावी लागेल त्याशिवाय तेही काम करू शकणार नाहीत. याबाबत पंडित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचा गांभीर्याने विचार करुन त्वरित पावले उचलतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here