कोल्हापूर:
जिल्ह्यात कालपासून पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगेची पातळी स्थिरावत आहे. काल सकाळी पंचगंगेच्या पातळीत ३ इंचांनी वाढ झाली, तर सायंकाळी पाणी पातळीत १ इंचाची घट झाली होती. मात्र, ती पुन्हा ४४.१० फूट इतकी झाली आहे. पावसाचा जोर कमी राहिला तर पंचगंगेची पातळी धोका पातळीच्या खाली जाऊ शकते, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
पंचगंगेच्या धोका पातळीत होत असलेल्या घटीने कोल्हापूरकरांना काही अंशी दिलासा मिळत असला तरी, महापुराचा विळखा कायम असून सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. सध्या राधानगरी धरणाच्या चार स्वयंचलित दरवाज्यांपैकी अनुक्रमे क्रमांक ६ आज सकाळी ५.३० तर क्रमांक ३ सकाळी ७.५ ला बंद करण्यात आले आहेत. क्रमांक ४ व ५ हे दरवाजे अद्यापही खुले असुन ४२५६ क्युसेक इतका विसर्ग चालु आहे. दरम्यान पावसाचा जोर कमी झाल्यास धरणाचे दरवाजे बंद होऊन पंचगंगेच्या पातळीत घट होऊ शकते, असा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे.