पालघर – योगेश चांदेकर:
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्थांना वाटण्यासाठी मागविण्यात आलेल्या 50 रुपये MRP असणाऱ्या हँड सॅनिटायझर बॉटलवर चक्क 190 रुपये MRP चे स्टिकर लावण्यात आले असल्याची एक्सक्लुजीव बातमी मुंबई ई न्यूजने प्रसिद्ध केली होती. बातमी प्रसिद्ध होताच खासदार राजेंद्र गावित यांनी याप्रश्नी लक्ष घालत चौकशी करण्याची मागणी केली होती. सध्या हे प्रकरण चौकशी अधीन असून याबाबत अहवाल मिळणे प्रलंबित आहे. या प्रकरणी वस्तुनिष्ठ अहवाल सादर होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे चढ्या दराने सॅनिटायझर विक्री करणाऱ्या डीलर व कंपनी विरोधात चौकशी व कारवाईच घोड नेमकं अडलंय कुठं असा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांना पडला आहे.
कासा ग्रामविकास अधिकारी मोहन पाचलकर यांना त्यावेळी विचारणा केली असता त्यांनी सॅनिटायझर पुरवठा करणाऱ्या बालाजी इंटरप्रायझेस यांनी १९० रु प्रति बॉटलचे कोटेशन दिले असल्याने त्यांचे बिल अदा केले नसल्याचे सांगितले होते. हे जर खरे होते तर त्यांनी याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासनाला कळविणे आवश्यक होते व सदर साठा जप्त करून ठेकेदारावर कारवाई करायला हवी होती. त्यामुळे दुसरी बाजू म्हणून यामध्ये वितरकाला वाचवण्यासाठी कुणी काम केले आहे का? ते देखील तपासणे आवश्यक आहे.
दरम्यान प्रेसिला या पालघरमधीलच सॅनिटायझर उत्पादक कंपनीचे ५० रुपये किमतीचे सॅनिटायझर बालाजी इंटरप्रायजेस या वितरकाने कासा ग्रामपंचायतला पुरविले होते. त्यामुळे याप्रश्नी अन्न व औषध विभागाने बालाजी इंटरप्रायजेस या वितरकाने जिल्ह्यात किती ठिकाणी चढ्या दराने सॅनिटायझर विक्री केली आहे हे तपासणे आवश्यक होते. मात्र महिना उलटत आला तरी वितरकाविरुद्ध व कंपनीविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई केल्याचे दिसत नाही. सोबतच पायलॉन(pylon) या कंपनीच्या १००ml बॉटलवर देखील २२० रुपये MRP छापण्यात आल्याचे पुरावे देखील मुंबई ई न्यूजने रिलीज केले होते. त्यामुळे या मुजोर वितरकांवर महामारी आपत्ती निवारण कायद्याच्या उल्लंघन प्रकरणी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई केली तरच भविष्यात अशाप्रकारचे कृत्य करण्याचे धाडस कुणी करणार नाही.