पालघर: मास्तर नेमकं चुकतंय कुठं… प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षक ‘अनफिट’ का?

0
385

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागात शिक्षकांची बदली करताना सर्व काही अलबेल झाले नसल्याचा दाखला देत या विभागातील अनागोंदी कारभार होत असल्याची बातमी
मुंबई ई न्यूजने केली होती. तसेच नियुक्तीच्या ठिकाणी असलेले काही शिक्षक हे शाळेत न जाता जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत असल्याची बातमी करत मुंबई ई न्यूजने या विभागात होत असलेल्या एकूणच अनागोंदी प्रकारांना उघडकीस आणण्याची मालिकाच सुरु केली आहे. प्राथमिक शाळेतील मुलांना मुल्यशिक्षणाचे, व्यायामाचे धडे देणाऱ्या शिक्षकांच्या संख्येत २०१९-२० या शैक्षणिक वर्षात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करणारे शिक्षकच अनफिट आहेत का असा सवाल उपस्थित होतो आहे.

सविस्तर माहिती अशी कि जिल्ह्यातील संवर्ग १ अन्वये होणाऱ्या बदलींमध्ये लाभ घेणाऱ्या शिक्षकांची २०१९ मधील संख्या ही २०१८ मधील संख्येपेक्षा तुलनात्मक दृष्ट्या काही पटींनी वाढल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे जर देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना घडवणारे शिक्षकच फीट नसतील तर त्यांच्याकडून ज्ञानदानाचे कार्य असा प्रश्न उपस्थित होतो आहे. चकित करणारी गोष्ट अशी आहे कि बदलीच्या वेळी वाढलेली ही संवर्ग १ मधील शिक्षकांची संख्या फिटनेस सर्टिफिकेट सादर करत असताना मात्र घटल्याचे सांगण्यात येते आहे. त्यामुळे बदलीच्या ठराविक कालावधी पुरतेच शिक्षक अनफिट कसे असतात? याची चौकशी होणे गरजेचे आहे. संवर्ग १ मधून बदलीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना खरे बोलण्याचे महत्व सांगणारे शिक्षक खोटी कागदपत्रे तर जोडत नाहीत ना? अशी शंका उपस्थित होते.

उदाहरणच द्यायचे झाल्यास वसई तालुक्यातील संवर्ग १ च्या लाभार्थ्यांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे पाहावयास मिळते. अशाप्रकारे बदलीच्या वेळी जर शिक्षकच खोटी माहिती व कागदपत्रे सादर करत असतील तर हि शासनाची निव्वळ फसवणूक आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली गेली पाहिजे तरच भविष्यात अशा प्रकारांना आळा बसेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here