पालघर: युरिया स्टींगसाठी गेलेल्या पत्रकाराला कट रचून मारहाण; उच्चस्तरीय चौकशीची मागणी..!

0
11013

मुंबई ई न्यूज नेटवर्क:

मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांनी विरोधात बातमी केल्याचा राग धरत जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुशील चुरी व सहकाऱ्यांनी कट रचून मारहाण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी योगेश चांदेकर यांनी सुशील चुरी, पिंटू चुरी आणि इतर ५ ते ६ सहकाऱ्यांविरोधात 143,144,145,148,149,324 कलमांतर्गत तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून समोर आलेल्या खुलाशांमुळे जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

सविस्तर बातमी अशी कि, पालघर तालुक्यातील बोईसर येथील कुडण याठिकाणी वडापाव विक्रेत्याला मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे कृषि व पशु संवर्धन सभापती सुशिल चुरी यांच्यासह तिघांविरोधात तारापुर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्याचा आधार घेत चांदेकर यांनी काही बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या त्या गोष्टीचा राग सुशिल चुरी याच्या मनात होता. तसेच योगेश चांदेकर काही दिवसांपासून युरियाच्या काळा बाजार होत असल्याच्या बातम्या करत आहेत याची त्याला कुणकुण लागली होती. त्यामुळे काळ्याबाजारात जाणाऱ्या युरिया साठ्याची माहिती दिल्यास चांदेकर सांगेल त्या ठिकाणी येऊ शकतो याची त्याने व सहकाऱ्यांनी शहानिशा करण्यासाठी काही लोकांना कामाला लावले. सुशिल चुरी हा युरियाचा काळाबाजार करत असून त्याबाबत आमच्याकडे माहिती असल्याचे एका व्यक्तीने चांदेकर यांना सांगत युरिया साठ्याचे फोटो पाठवले व अधिक माहिती घेण्यासाठी आपल्याला मिळून वाडीतील एका ठिकाणी जावे लागेल असे सांगितले. त्यानुसार तेथे गेलो असता आपणांस सुशील चुरी व समर्थकांनी मारहाण केली असल्याचा आरोप चांदेकर यांनी केला आहे.

दरम्यान आपल्याला सोबत नेणाऱ्या तरुणाने वाडीच्या बाहेर गाडी थांबवत मी आत पाहून आलो असे सांगत ठरलेल्या ठिकाणी आल्यानंतर पोबारा केला, त्याचवेळी अचानक आलेल्या सुशील चुरी, पिंटू चुरी व ५-६ अनोळखी इसमांनी आपणांस मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मारत-मारतच आपणांस पोलीस ठाण्यात नेण्यात आले असे चांदेकर यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

त्यामुळे विनयभंगाचा आरोप हा जाणीवपूर्वक करण्यात आला असून कट रचून आपणांस बदनाम करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या हक्काचा युरिया काळ्याबाजारात जाऊ नये यासाठी जीव जोखमीत घालणाऱ्या पत्रकाराला अशाप्रकारे बदनाम केले जाणे चुकीचे असून याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून न्याय मिळावा अशी अपेक्षा लोकांनी व्यक्त केली.

मुंबई ई न्यूजची भूमिका:

मुंबई ई न्यूजचे पालघर विभागीय संपादक योगेश चांदेकर यांना झालेल्या मारहाणीचा निषेध..! सदर प्रकाराबाबत दोन्ही बाजुंनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाल्याने पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत यावर भाष्य करणे चुकीचेच राहील. मात्र सामान्य जनतेला न्याय मिळावा यासाठी चांदेकर यांनी अनेकवेळा पत्रकारितेचा उपयोग केला आहे. अशा कठीणप्रसंगी मुंबई ई न्यूजचा संपूर्ण परिवार त्यांच्या पाठीशी आहे. मात्र असे असले तरी न्यायदेवता हि सर्वोच्च असून लवकरच याप्रकरणातील सत्य बाहेर येईल…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here