पालघर – योगेश चांदेकर:

शेतकऱ्यांच्या निरक्षरतेचा गैरफायदा घेत काही लोकांनी रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांना मिळालेल्या नुकसानभरपाईच्या रकमेतील ३० ते ३५ टक्के रक्कम लाटल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे. या कथित टोळीमध्ये नक्की कोणकोण आहे हे उच्चस्तरीय चौकशीतून लवकरच बाहेर देखील येईल. मात्र जे लोक हे आरोप खोटे आहेत असा कांगावा करत आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार जर यात तथ्य नसेल तर एवढा धुराळा का उडवत आहेत? जर गराड्यातील हि सर्व मंडळी शेतकरी हिताच्या पालखीचेच ते भोई असतील तर ते एवढा धुराळा का उडवत आहेत? त्यांनी आढेवेढे न घेता स्वतः शेतकऱ्यांवर जर कोण अन्याय करत असेल तर याप्रकरणातील तथ्य बाहेर काढण्यासाठी चौकशीचा पुरस्कार करायला हवा होता. कदाचित त्या सर्वांनाच ‘कोंबड कितीही झाकलं तरी दिवस होतोच’ या म्हणीचा विसर पडला असेल.

शेतकऱ्यांना जास्तीचा मोबदला मिळावा यासाठी तसेच जमीन अधिग्रहण बाबत पारदर्शकता असावी अशा मागण्यांसाठी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी रिलायन्स विरोधात मुठी आवळत एल्गार केला होता. रिलायन्स पाईपलाईन प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी कृती समिती स्थापन करत लॉंगमार्चचे नियोजन करत राज्यसरकारचे याकडे लक्ष वेधले होते. शेतकऱ्यांनी अतिशय विश्वासाने व एकजुटीने हा लढा उभारला होता. असे असले तरी टप्प्याटप्प्याने देण्यात येत असलेली नुकसानभरपाई काही गावांतील शेतकऱ्यांना अद्याप मिळणे बाकी आहे. म्हणजे लोकलढ्याची मूठ सैल होऊन हात स्वच्छ धुवून तो कोरडा होण्याअगोदरच पुन्हा मुठी आवळण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे असे दिसते. तसा संघर्ष शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलाय मात्र कधी कधी तो स्वकीयांसोबतच करावा लागतो या गोष्टीचं दुःख जरा अधिकचं असतं. आज हा लढा पुन्हा नव्याने लढायचा आहे कारण म्हातारी गेल्याच दुःख नाही पण काळ सोकावतोय अशी अवस्था आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here