पालघर: शेतकऱ्यांचा युरिया खाणाऱ्यांनो.. तुमचा भांडाफोड नक्की होणार..!

0
430

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून सबसिडी यूरियाचा मोठा काळाबाजार सुरु असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. यामध्ये काही लोकप्रतिनिधींसोबतच त्यांच्या चमच्यांचा देखील सहभाग असल्याचे शेतकऱ्यांच्या चर्चेतून ऐकण्यास मिळत आहे. हा लोकप्रतिनिधी कोण आणि त्याचे चमचे कोण याची चर्चा शेतकऱ्यांच्या चर्चांमध्ये खुमासदार किस्से ऐकावयास मिळत आहेत. मात्र कृषी विभाग अजूनही या प्रकरणात शांतच असून या शांततेमागचं गौडबंगाल काय? हा प्रश्न देखील शेतकरी वर्गात चर्चिला जात आहे.

शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये हि कृषी विभागाची जबाबदारी आहे. मात्र आपल्या कर्तव्याचा अधिकाऱ्यांना विसर पडला आहे कि काय? असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. युरिया माफियांकडून लोकप्रतिनिधींच्या नावाचा व पक्षाचा ढाल म्हणून वापर होताना दिसत आहे. रात्रीच्या अंधारात युरियाचा गोरखधंदा करणारे दिवसाच्या लख्ख उजेडात बिनदिक्कत माना वर करून फिरत आहेत. खासगीमध्ये बोलताना या घोटाळ्यात सामील असणाऱ्या लोकप्रतिनिधी व त्यांच्या चमचांच्या नावाची भली मोठी यादीच बाहेर येते. मुख्यमंत्र्यांपासून ते थेट पंतप्रधानांपर्यंत अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या मागेपुढे करणारी मंडळीच यामध्ये सामील असल्याचे देखील बोलले जात आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचा युरिया खाणाऱ्या माफियांची नावे ऐकताना आपसूकचं ‘हास्याचे तुषार’ बाहेर पडतात.

समाजात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्यांपैकीच काही लोकांकडून युरिया फस्त केला जात आहे हे खरे कि खोटे हे देवच जाणे. एक मात्र नक्की ज्याप्रकारे रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या गँगचा जसा भांडाफोड झाला तसाच याही प्रकरणातील माफियांचा होईल हे नक्की. आज ताठ मानेने वावरणाऱ्या प्रतिष्ठितांचा बुरखा टराटरा फाटल्यानंतर त्यांना चुकीची उमग होईल. मात्र हे सर्व होत असताना कृषी विभागाने बघ्याची भूमिका घेणे दुर्दैवी आहे अशा संतप्त भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here