पालघर: जि. प. अध्यक्षांच्या लेटर बॉम्बने ‘त्या’ महिला अधिकाऱ्यावर कारवाईची टांगती तलवार?

0
8603

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अनागोंदी कारभाराविरोधात शिक्षकांसोबतच लोकप्रतिनिधींकडून देखील आवाज उठत आहे. जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शिवाजी गट पालघर यांनी आंदोलनाचं हत्यार उपसण्याचे संकेत दिले आहेत. शिक्षकांच्या मागण्यांबाबत लोकप्रतिनिधी आग्रही असून देखील केवळ अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे मागण्यांचे भिजत घोंगडं असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान शिक्षकांच्या आंदोलनाबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी यांच्याशी संपर्क साधला असता “शिक्षणाधिकारी लता सानप यांच्या कार्यपद्धतीची तक्रार थेट शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. केवळ एका अधिकाऱ्याच्या बेजाबदार कार्यपद्धतीमुळे शिक्षकांसह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर शिक्षणमंत्री आम्हाला न्याय देतील.” अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. जिल्ह्यातील शिक्षण पद्धतीला सानप यांच्यामुळे गंज चढला आहे. सानप यांच्यामुळेच शिक्षकांच्या मनात लोकप्रतिनिधींबद्दल रोष निर्माण होत आहे. असा तक्रारींचा पाढा असणारं निवेदन शिक्षणमंत्र्यांना पाठवलं असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबई ई न्यूजने यापूर्वीही अनेकवेळा शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. शिक्षकच मागण्यासाठी झगडत राहिले तर ज्ञानदानाचं काम चोख कसे होईल? नव्याने निर्माण झालेला हा जिल्हा शैक्षणिक दृष्ट्या महाराष्ट्रात अग्रेसर व्हावा हीच प्रामाणिक भूमिका यामागे आहे. त्यामुळे जि. प. अध्यक्षांच्या या ‘लेटर बाँब’वर शिक्षणमंत्री काय निर्णय घेणार याकडे शिक्षकांसह सर्व जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here