पालघर। (योगेश चांदेकर) जगभरात कोरोनाने धुमाकुळ घातल्याच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच आता काळजी घेतली जात आहे. महाराष्ट्र सरकारच्यावतीने देखील विविध उपाययोजना आखल्या जात असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून त्याबाबतची माहिती नागरिकांना वेळोवेळी दिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी यांनी खेडोपाडी पोहचून याबाबतचा आढावा घेणे सुरू केले आहे. यावेळी त्यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करत योग्य ती काळजी घेण्याचे तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये याविषयी विविध उपाययोजनांची माहिती दिली.
- कोरोनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरण्यात येणारे मास्क, वारंवार स्वच्छ पाणी आणि साबणाने हात धुणे, हस्तांदोलन टाळणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे अशा विविध बाबी नागरिकांना समजावून सांगितल्या.

जिल्हा परिषद अध्यक्ष सौ भारती कामडी यांनी पाणीपुरवठा अधिकारी यांच्यासोबत आज पंचाळी ग्रामपंचायत मधील आगवन आणि परिसरातील गावांचा दौरा केला. यावेळी त्यांनी आगवन गावातील निकामी झालेल्या पाईप लाईनची तसेच जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर पाणीपुरवठा व संबंधित अधिकारी यांना योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सरपंच भौतेश पाटील, उपसरपंच, माजी सरपंच, उपतालुका प्रमुख अनिल तरे, उपजिल्हा महिला संघटक अंकिता तरे, ग्रामपंचायत सदस्य व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.