पालघर – योगेश चांदेकर:
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चारोटी टोलनाका येथे पोलीसांच्या सतर्कतेमुळे लाखो रुपये किंमतीचे बेकायदेशीर खैर लाकूड वाहतूक करणाऱ्या टेंपोला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पहाटे चारच्या सुमारास कासा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये आपल्या पथकासह गस्त घालत असताना चारोटी टोलनाका येथे त्यांना गुजरात कडून पनवेलच्या दिशेने जात असणारा एक संशयित टेंपो आढळला. गहू, तांदूळ वाहतूक असा बॅनर या टेंपोवर लावण्यात आला होता. त्यास अडवून चौकशी केली असता पोलीसांचा संशय अधिकच बळावला. टेंपोची झाडाझडती घेतल्यानंतर ६० ते ७० गव्हाच्या गोण्याखाली १० ते १२ टन खैर लाकडाचे ओंडके असल्याचे पोलिसांना दिसले. टेंपोसह चालक व आणखी एकास पोलीसांनी ताब्यात घेतले असून कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“वन विभागाला या कारवाईची माहिती देण्यात आली असून यासंबंधी वन गुन्ह्यासोबतच कासा पोलीस ठाण्यात देखील गुन्हा नोंदवला आहे, या प्रकरणाचा मी स्वतः तपास करणार आहे” अशी माहिती कासा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांनी दिली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून यामध्ये या दोघांशिवाय इतर काही लोकांची टोळी देखील कार्यरत आहे का? याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान ही खैरतोड कुठे झाली याबाबत नक्की माहिती मिळालेली नसली तरी वन विभागातील अधिकारी व कर्मचारी करतात तरी काय अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाल्याचे पहावयास मिळते आहे. काही दिवसांपूर्वी चारोटी टोलनाका परिसरात असेच स्पाईन वूडची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रेलरला डहाणू येथील सहाय्यक वनसंरक्षक राहुल मराठे यांच्या तोंडी आदेशावरून वन परिक्षेत्र अधिकारी एस एस पाटील यांनी कोणतीही कारवाई न करता सोडून दिले होते. त्या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू असताना आज पोलिसांनी पकडलेल्या या बेकायदेशीर पद्धतीने खैर लाकूड वाहतूक करणाऱ्या टेंपोच्या निमित्ताने वनविभागाच्या एकूण कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. गेल्यावेळी स्पाईन वूड वाहतुकीस तोंडी आदेश देत अभय दिले त्याप्रमाणे यावेळी देखील एखाद्या अधिकाऱ्याच्या कृपेने तर या वाहनास मोकळीक दिली नाही ना? असा संशय निर्माण होण्यास वाव मिळतो.
कासा पोलीस ठाण्यात कार्यभार स्वीकारल्यापासून सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांनी धडक कारवाई करण्याचा सपाटाच लावला आहे. दरम्यान सदर कारवाई सिद्धवा जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय रघुनाथ चौधरी, पोलीस नाईक नरेश जनाठे, पोलीस नाईक राजू भोई, कॉन्स्टेबल यशवंत पाटील, कॉन्स्टेबल भास्कर सोनवणे यांनी तडीस नेली आहे.