मुंबई – प्रतिनिधी:
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले आहे. कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी देशात २१ दिवसाची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परदेशातून आलेल्या लोकांनाही १४ दिवसाचे सक्तीचे होम क्वारंटाईन पाळण्यास सांगण्यात आले आहे. प्रशासन, आरोग्य कर्मचारी जीवाचे रान करत असताना नायर रुग्णालयातील परिचारिकांना एन-९५ मास्क, सुरक्षा किट अशा इतर सोई सुविधा देखील मिळत नसल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सदर रुग्णालयात डॉक्टरांखेरीज इतर स्टाफला एन-९५ मास्क, सुरक्षा किट देखील न मिळताच कोरोना बाधित रुग्णांना सेवा द्यावी लागत असल्याची माहिती समोर आली आहे. सदर रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १० परिचारिकांना होम क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे. यामुळे आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना लागण होण्याची देखील भीती आहे. या कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य देखील धोक्यात येण्याची भीती आहे.
संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन परिचारिकांना पुरेशी सुविधा मिळवून द्यावी अशी परिचारिकांची माफक अपेक्षा पूर्ण होणार का हे लवकरच कळेल.