पालघर: ‘भीती होती तेच झाले’; भुकेने व्याकुळ ३ वर्षाच्या मुलीसह आदिवासी महिलेची आत्महत्या

0
429

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एका आदिवासी महिलेने(वय ३० वर्षे) तीन वर्षांच्या चिमुकलीसह स्वतःला गळफास लावून आत्महत्या केल्याचे माहिती जिल्हा पोलिसांनी दिली आहे. आत्महत्येप्रकरणी मयत महिलेच्या विरोधात कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पी. आय जव्हार, अप्पाशीब लेनगारे यांनी दिली आहे.

मयत महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार सदर महिला व तिचा पती हे मिळेल ती मोलमजुरी करून व वीटभट्टी वरील काम करून आपला उदर निर्वाह करत होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सुरु असल्याने सर्वच उद्योगधंदे बंद झाले. उत्पन्नाचा इतर कोणताच स्रोत नसल्याने व कुठून मदतही मिळत नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. गरिबीमुळे पूर्णपणे उदास झालेली गृहिणी आणि कोणाकडूनही कसलीही मदत न आल्याने शेवटी तिने मुलीला गळफास लावत आयुष्य संपवून घेतली.

२३-२४ जून रोजी मध्यरात्रीच्या वेळी तिने बोरिचामाळ येथील घराजवळील जंगलात जाऊन तीन वर्षांच्या मुलीचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर त्याच साडीच्या सहाय्याने झाडाला गळफास लावून घेतला. बुधवारी पहाटे ग्रामस्थांना ही महिला झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. मुलगी व महिलेचा मृतदेह सरकारी रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले आणि नंतर तिच्या पतीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदविला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान श्रमजीवी संघटना संस्थापक तथा अनुसूचित क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी मजुरांच्या संभाव्य उपासमारीच्या प्रश्नावर आवाज उठवत सरकारला याबाबत अवगत केले होते. महिलेच्या मृत्यू(आत्महत्या) बद्दल भाष्य करताना ते म्हणाले की, ज्या गोष्टींची आपल्या सर्वांना भीती वाटत होती ती आज खरी ठरली. अनेक वेळा सरकारला भुकेल्या आदिवासींच्या गरजा भागवायला सांगत होतो. एक दिवस “कोरोनाने” नव्हे तर उपासमारीने जास्त लोक मरण पावतील असे सांगून सुद्धा सरकारने गांभीर्याने घेतले नाही अशी खंत त्यांनी बोलताना व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here