वनविकास कि वनभकास महामंडळ; खळबळजनक पालघरमध्ये खैराच्या झाडांची खुलेआम कत्तल!

0
491

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर तालुक्यातील मौजे मेंढवन येथे कूप नंबर 191 व 207 मध्ये वनविकास महामंडळ यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खैर प्रजातीच्या वृक्षांची कत्तल करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ग्रामसभेचा ठराव न घेता सर्व नियम धाब्यावर बसवत सदरची वृक्षतोड करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. या अनागोंदी कारभाराने वनविकास महामंडळाच्या एकूण कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ही तोड कोणत्या उद्देशाने करण्यात आली? याला ग्रामसभेचे ना हरकत पत्र गरजेचे नाही का? हि वृक्षतोड कुणाच्या आदेशावरून करण्यात आली? अधिकाऱ्यांनी खैर माफियांशी हात मिळवणी केलीय का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हे जर असेच चालू राहिले तर येथे निसर्गतः लाभलेली वनसंपदा धोक्यात येईल हे नक्की.

जंगलाची योग्य काळजी तेथील स्थानिकच घेऊ शकतात, जेव्हा जंगलाला वणवे लागतात तेव्हा वनविभाग किंवा सरकारी यंत्रणांच्या अगोदर स्थानिक वणवा विजवण्यासाठी पुढे असतात. तसेच स्थानिकांचे सहकार्य नसेल तर जंगल राखणे देखील कठीण होऊन जाते, ह्यासाठी केंद्र शासनाने काही वर्षांपूर्वी पेसा(१९९६) कायदा अस्तित्वात आणला. सदर झालेली तोड ह्या कायद्यान्वये चुकीची आहे. पेसा कायद्या अंतर्गत ग्रामपंचायत ठराव देत नाही तोवर जंगला संबंधि काम करता येत नाही. त्यामुळे ग्रामसभेच्या परवानगी शिवाय करण्यात आलेल्या वृक्षतोडीची चौकशी करून संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

  • “केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विरळीकरणाची प्रक्रिया अधिकाऱ्यांना समजलेली नाही. फक्त विरळीकरणाची परवानगी असताना जर वृक्षतोड झालेली असेल तर संबंधितांवर मोक्का व अनालॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट कलम ३,१०,११ प्रमाणे विभागीय व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक व वन क्षेत्रपाल यांच्यावर दंडनीय कारवाई होणे गरजेचे आहे.”
    हेमंत छाजेड, माजी सदस्य(राज्य वन जमिनी समिती, महाराष्ट्र)

  • “ग्रामदान मंडळाच्या परवानगी शिवाय आणि कोणतीही गरज नसताना मेंढवन खिंडीतील खैराची झाडे कापण्यात आली आहेत. जंगलातील झाडांची संख्या कमी होत असताना वन विकास महामंडळांकडून वृक्ष तोड केली जात असल्याने याचे पर्यावरणावर वाईट परिणाम होणार आहेत. त्यामुळे मेंढवन ग्रामदान मंडळाची परवानगी न घेता केलेली वृक्षतोड हि बेकायदेशीर आहे.” – बिस्तुर कुवरा, सरपंच मेंढवन ग्रामदान मंडळ


  • “महाराष्ट्रभर केली जाणारी किंबहुना संपूर्ण देशभर केली जाणारी वृक्षतोड ही ब्रिटिशांनी आखून दिलेल्या जुन्या कूप पद्धतीने होत आहे. ज्यात ठराविक कालावधीनंतर जंगलातील परिपक्व झालेली झाडे तोडून त्याच्या छायेखाली वाढणाऱ्या लहान रोपट्यांना वाढण्यासाठी मोठी झाडे कापली जात असत. परंतु त्या विभागातील परिसंस्था न पाहता वृक्षतोड केल्याने अगोदरच खराब असलेली जंगलाची प्रत आणखी खराब होत आहे. केंद्र सरकारने याकडे लक्ष देऊन योग्य ती दुरुस्ती केली तरच जंगले वाचतील.” – भूषम भोईर, पर्यावरण समीक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here