पालघर – योगेश चांदेकर:
रिलायन्स गॅस पाईपलाईन बाधित शेतकरी लुबाडणूक प्रकरणातील दोन आरोपींचे जामीन अर्ज पालघर जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळले. या प्रकरणात फरार आरोपी गणेश किसन आडगा याचा अटकपूर्व जामिनासाठीचा व इतर एक असे दोघांचे जामिन अर्ज फेटाळण्यात आला आहे. अटकेतील पाच आरोपींपैकी एका आरोपीला कोरोनाची लागण झाल्याने सर्वच आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
दरम्यान यापूर्वी मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर या सर्व आरोपींचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते. तदनंतर पालघर जिल्हा सत्र न्यायालयातही चार आरोपींचे जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव यामुळे तपासासाठी येत असलेल्या मर्यादा, गुन्ह्याची एकूण व्याप्ती व स्वरूप आणि आरोपींच्या समर्थकांनी अन्यायग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांना दिलेल्या धमक्या या पार्श्वभूमीवर आरोपींचा जामीन अर्ज फेटाळल्याची माहिती आहे. या प्रकरणातील ५ आरोपी सध्या फरार असून त्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.