कष्टकरी संघटनेचा माकपचे विधानसभा उमेदवार कॉ. विनोद निकोले यांना पाठिंबा जाहीर!

पालघर-योगेश चांदेकर

पालघर- शहीद भगतसिंग जयंतीदिनी, पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात एक ऐतिहासिक घटना घडली. १९७० साली कष्टकरी संघटनेच्या स्थापनेनंतरच्या जवळजवळ ५० वर्षांत प्रथमच वेती वरोती या गावात कष्टकरी संघटना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पहिला संयुक्त मेळावा झाला. त्यात कष्टकरी संघटनेने माकपचे विधानसभा उमेदवार कॉ. विनोद निकोले यांना आपला संपूर्ण आणि सक्रिय पाठिंबा जाहीर केला.

सर्व डावे पक्ष, बहुजन विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि लोक भारती या पक्षांनी डहाणूच्या जागेवर माकपला पाठिंबा जाहीर केला आहे. या सर्वांच्या पाठिंब्यामुळे माकपला मोलाची मदत मिळणार आहे. अर्थात माकपचा स्वतंत्र प्रचार सर्वत्र जोरात सुरू झाला आहे.

मध्यंतरीच्या काळात अनेक दशके ठाणे-पालघर जिल्ह्यात माकप आणि कष्टकरी संघटनेत टोकाचा दुरावा आणि संघर्ष निर्माण झाला होता. पण गेल्या दोन-तीन वर्षांत भूमी अधिकार आंदोलनाच्या व्यासपीठाखाली बुलेट ट्रेन आणि एक्सप्रेसवे विरुद्ध झालेले सातत्याचे संयुक्त संघर्ष, आदिवासींच्या वनाधिकारावर भाजपचे केंद्र आणि राज्य सरकार करत असलेल्या हल्ल्यांना संयुक्त विरोध आणि एकूणच धर्मांध, हुकूमशाही व जनविरोधी आरएसएस-भाजपचा वाढलेला धोका या पार्श्वभूमीवर दोहोंमध्ये संवाद वाढविण्याचे दोन्ही बाजूंनी प्रामाणिक प्रयत्न झाले. कालचा संयुक्त मेळावा ही त्याची फलश्रुती होती.

जिल्ह्यातील २००हून अधिक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित असलेल्या कालच्या मेळाव्यास कष्टकरी संघटनेचे नेते प्रदीप प्रभू, सिराज बलसारा, ब्रायन लोबो, मधू धोडी आणि काळूराम धांगडा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. अशोक ढवळे, किसन गुजर, बारक्या मांगात आणि उमेदवार विनोद निकोले यांनी संबोधित केले. श्रमिक जनतेच्या हितासाठी भाजप सरकारविरुद्ध संयुक्त संघर्ष तीव्र करत असतानाच, सर्व जुने मतभेद आणि गैरसमज गाडून टाकून मैत्री आणि सहकार्याच्या नव्या पर्वाची सुरुवात करण्याची ग्वाही वरील सर्व नेत्यांनी दिली.

याप्रसंगी माकपचे राज्य कमिटी सदस्य सुनील धानवा, जिल्हा कमिटी सदस्य राजा गहला, चंद्रकांत वरठा, बच्चू वाघात, चंद्रकांत घोरखाना, अमृत भावर, प्रकाश चौधरी, सुदाम धिंडा, हीना वनगा व इतर अनेक कार्यकर्ते हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here