पालघर। त्या 4 प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत; प्रशासनाने दिली ‘हि’ माहिती!

0
412

पालघर। (योगेश चांदेकर) परदेशवारी करून आलेल्या गुजरात राज्यातील ‘त्या’ चार प्रवाशांच्या हातावर अलगीकरणाचा शिक्का असल्याने सहप्रवासी व तिकीट तपासणीस यांनी त्यांना पालघर रेल्वे स्थानकात गाडी थांबून उतरण्यास भाग पाडले. या चारही प्रवाशांमध्ये करोनाची लक्षणे दिसत नसल्याने त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांच्या आग्रहापोटी खासगी वाहनातून त्यांना त्यांच्या मूळ गावी जाण्याची मुभा जिल्हा प्रशासनाने दिली.

12216 डाऊन गरिबरथ या गाडीमध्ये जी-4 आणि जी-5 या दोन डब्यांमध्ये चार प्रवाशांच्या हातावर अलगीकरण करण्याचे शिक्के होते. सदर शिक्के सहप्रवाशांनी पाहिल्यानंतर त्यांनी ही बाब तिकीट तपासनीसच्या निदर्शनास आणून दिली. अशा प्रवाशांच्या सहवासामुळे आपले आरोग्य धोक्यात येईल हे लक्षात घेता तिकीट तपासनीस यांच्याकडे आक्षेप नोंदवला. नंतर तिकीट तपासणीसांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून सदर रेल्वे पालघर रेल्वे स्थानकात थांबविण्याच्या सूचना दिल्या.

पालघर रेल्वे स्थानकात दिल्लीकडे जाणारी गाडी थांबत असून त्याच्यामध्ये करोनाबाधित रुग्ण असल्याची उद्घोषणा करण्यात आली. फलाटावर करण्यात आलेल्या उद्घोषणेनंतर उपस्थित प्रवासी व इतर नागरिकांची एकच धावपळ सुरु झाली. खबरदारी म्हणून फलाट रिकामे करण्यात आला. दोन वाजण्याच्या सुमारास ही गाडी पालघर रेल्वे स्थानकात थांबल्यानंतर या चार प्रवाशांना स्वतंत्र कक्षामध्ये ठेवण्यात आले. जिल्हा आरोग्य पथकाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रवाशांची तपासणी केली असता या चारही प्रवाशांमध्ये कोणत्याही प्रकारची कोरोना व्हायरसची लक्षणं आढळत नसल्याचे दिसून आले.

या रुग्णांना बोईसर येथील टिमा रुग्णालयात निर्माण केलेल्या स्वतंत्र अलगीकरण कक्षात ठेवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र हे प्रवासी पालघर येथे वास्तव्य करण्यास तयार नसल्याने तसेच जर्मनीहून आलेल्या या प्रवाशांनी आपल्या मूळ गावी जाण्याचा आग्रह धरला. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्य कोरोना कक्षाशी संपर्क साधून, त्यांच्याकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर, खासगी वाहनातून त्यांना सूरतच्या दिशेने पाठवण्यात आल्याची माहिती पालघरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी दिली.

या चार प्रवाशांची माहिती जिल्हा प्रशासनाने गुजरात राज्याच्या आरोग्य विभागाला कळवली असून या चारही रुग्णांचा पाठपुरावा पालघर करोना दक्षता कक्षातून देखील करण्यात येईल अशी माहिती पालघरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी दिली.

डॉ. कांचन वानेरे – जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. राजेंद्र केळकर – अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. दीपक वाणी – निवासी वैद्यकीय अधिकारी(बाह्य संपर्क), डॉ. सागर पाटील – जिल्हा सर्वेक्षण अधिकारी, डॉ. मिलिंद चव्हाण – जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी तसेच तालूका आरोगय अधिकारी अभिजीत खंदारे या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्दर्शनाखाली कोरोनो बाबत जनजागृति व सर्वेक्षण केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here