पालघर-योगेश चांदेकर :
पालघर-स्वातंत्र्य पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपेलेले स्वातंत्र्य आजही गरीबाच्या झोपडीत पोहचलेले नाही. आमच्या मूलभूत हक्कांसाठी अजून किती दिवस चर्चा आणि निवेदने द्यायची असा संतप्त सवाल करत स्वातंत्र्याची भीक नको, हक्काचे स्वातंत्र्य पाहिजे आणि ते नाही मिळाले तर हिसकावून घेऊ अशी गर्जना आज श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी केली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उसगाव डोंगरी येथे झालेल्या कार्यक्रमात श्रमजीवी संघटनेने दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईचा निर्धार केला. यापुढे अहिंसकच मात्र प्रखर आणि निर्णायक संघर्ष होईल असे सांगत स्वातंत्र्यासाठी संडणाऱ्या स्वातंत्र्यवीराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्रमजीवीचा सैनिक हा लढा आता पुढे नेईल असे पंडित यांनी सांगितले. याचवेळी उसगाव डोंगरी येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले.
दोन वर्षांनी स्वातंत्र्याचा हिरक महोत्सव साजरा केला जाईल, मात्र 1947 ला मिळालेले स्वातंत्र्य हे केवळ मूठभर धनधाडग्यांना मिळाले. गरीब कष्टकरी आदिवासी बांधव आजही आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित आहे. संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुता दिली मात्र प्रत्यक्षात ती कुठे आहे असा प्रश्न वीटभट्टी वरील वेठबिगार मजूरांच्या वेदना पाहिल्यावर पडतो असे विवेक पंडित यांनी आपल्या भाषणात संगितले.
पुढील महिन्यात ठाणे, पालघर, रायगड, मुंबई आणि नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातील आदिवासींच्या वेदना असह्य आहेत. त्यांची भूक, दारिद्य्र, बेरोजगारी आजही तशीच आहे. कुपोषणाने हजारो बालकं मृत्यूच्या मुखात जात आहेत. आदिवासी मजूर वेठबिगारीसारख्या गुलामगिरीच्या पाशात अडकलेला आहे मग कसे म्हणायचे आपण स्वतंत्र्य आहोत.
ही लढाई आता पुढे नेण्याची वेळ आली आहे. ही वेळ चर्चेची नाही तर युद्धाची आहे. महात्मा गांधीजींनी दिलेल्या अहिंसक या आंदोलनाच्या मार्गाने यापुढे प्रखर आणि निर्णायक आंदोलन होतील. याबाबत लवकर घोषणा केली जाईल असे पंडित यांनी सांगत राज्यातील प्रश्नांवर समाधान नाही झाले तर मुख्यमंत्री राहतात त्या मातोश्रीवर देखील धडक दिली जाईल असेही पंडित यांनी जाहीर केले.

सध्या संघटनेच्या प्रत्येक गावात बैठका सूरु असून गावकमेटी बळकट करण्याचे काम सुरू आहे, शिबीर आणि बैठकातून श्रमजीवी सैनिक घडविण्याचे काम सुरू आहे. येत्या काळात श्रमजीवी चे सैनिक सरकार विरोधातील लढाई अत्यंत तीव्रतेने निर्णायक भूमिकेत लढतील असे संकेत विवेक पंडित यांच्या बोलण्यातून मिळाले. यावेळी पंडित यांनी देशात सुरू असलेल्या धर्म जातीच्या राजकारणाचाही समाचार घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकर असो वा राष्ट्रपिता महात्मा गांधी असो कोणत्याही राष्ट्रपुरुषाला कमी लेखणारांनी आपली पात्रता ओळखावी असे खडे बोल पंडित यांनी सुनावले. कोणत्याही धर्म पंथ पक्षीय विचारापेक्षा देश आणि देशप्रेमी सर्वश्रेष्ठ आहे असे त्यांनी नमूद केले. या निर्धार मेळाव्याला ठाणे, पालघर,नाशिक, रायगड आणि मुंबईतून तब्बल 5 ते 6 हजार श्रमजीवी सैनिक सहभागी झाले होते.
भगवान बिरसा मुंडा स्मारक भूमिपूजन आणि श्रमजीवी कृषी प्रभोदिनी शुभारंभ
यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मारकाचे भूमीपूजन विवेक पंडित, ज्येष्ठ पत्रकार एस रामकृष्णन ,पत्रकार शरद पाटील, संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, कार्याध्यक्ष केशव नानकर,उपकार्याध्यक्ष स्नेहा दुबे पंडित, सरचिटणीस बाळाराम भोईर, विजय जाधव,कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांच्या हस्ते पार पडले. समारोपाच्या वेळी पंडित यांनी कृषी तज्ञ डॉ. जयंत पाटील यांच्या नावाने श्रमजीवी कृषी प्रभोदिनी आजपासून सुरू केल्याचे जाहीर करत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, संघटन आणि शेतीविकास यासाठी या प्रभोदिनीचे प्रमुख म्हणून डॉ.सुमित धाक (ज्यांच्या प्रबंधाचे नुकताच जर्मनीच्या लंबर्ट युनिव्हर्सिटीने पुस्तक रुपात प्रकाशन केले) यांच्यावर जबाबदारी दिली.