पालघर: जगण्यासाठीच्या लढ्यात ‘त्या’ रुग्णाला हवंय प्रशासनाच सहकार्य!

0
425

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर तालुक्यातील सफाळे भागातील डोंगरे येथील विजया जगदीश पाटील (वय ४५) यांना आठवड्यातून तीनवेळा दहिसर येथील नवनीत हॉस्पिटलमध्ये डायलेसिससाठी जावे लागते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनमुळे वाहतूक बंद असल्याने त्यांना सफाळे ते दहिसर प्रवास करणे खूपच जिकरीचे झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने जवळील एखाद्या रुग्णालयात डायलेसीसची सुविधा मिळवून द्यावी अशी मागणी या रुग्णाच्या कुटुंबियांकडून होत आहे. आठवड्यातून तीन वेळा डोंगरे ते दहिसर असा प्रवास करावा लागतो. लॉक डाऊनमुळे रेल्वेसेवा बंद असल्याने सध्या डोंगरे ते माकुनसार हा १० कि.मी. चा प्रवास दुचाकीवरून व पुढील माकुनसार ते दहिसर हा ६५ कि. मी. चा प्रवास बसने करावा लागतो आहे.

तुटपुंजी शेती असणाऱ्या शेतकरी कुटुंबातील विजया पाटील यांच्या दहावर्षांपूर्वी दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्यांचं संपूर्ण कुटुंबच विस्कळीत झालं. खेळण्या-बागडण्याच्या वयात त्यांच्या लहान मुलीवर (त्यावेळी वय १२ ते १३) घरातील सगळे काम आणि आईची सेवा या गोष्टींची जबाबदारी पडली. मुलगा विशाल हा घरातील कमावणारा एकटाच, वडील जमेल तसं घरच्या शेतातील काम बघतात.

सुरुवातीला विजया यांना आठवड्यातून एकदा डायलेसिससाठी जावं लागायचं मात्र प्रकृती खालावत असल्याने आठवड्यातून तीनवेळा त्यांच्या डायलेसीसची सुरुवात झाली. त्यात हॉस्पिटलला एकटीला जाऊन येणं अशक्य झालं आणि सोबतीला घरातील एकजण असा क्रम सुरु झाला. अशा बिकट परिस्थितीत या कुटुंबाचा १० वर्षांपासून जगण्यासाठीचा संघर्ष सुरु आहे. हॉस्पिटल व इतर खर्चासाठी मुंबईतील काही ट्रस्टकडून मदत मिळत होती ती देखील आता कोरोनामुळे लॉक डाऊन असल्याने बंद झाली आहे.

कोरोनाच्या अगोदर जाऊन परत येण्याचा दोघांचा प्रवास खर्च हा १०० रुपये यायचा आज तोच खर्च ४८० रुपये येतोय याव्यतिरिक्त औषधोपचारासाठी येणारा इतर खर्च वेगळाच आहे. संचारबंदीमुळे काम बंद असल्याने नातेवाईक, मित्रांकडून हातउसने पैसे घेऊन हा खर्च सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाने किमान कोरोनाचे संकट टळेपर्यंत जवळील एखाद्या रुग्णालयात डायलेसीसची सुविधा मिळवून द्यावी अशी मागणी या रुग्णाच्या कुटुंबियांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here