MUMBAI e NEWS –
पालघर-योगेश चांदेकर :

दिवसेंदिवस आश्रमशाळेत होणाऱ्या मृत्यु विशेषतः आत्महत्या आणि संशयास्पद मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहेत. या शाळा आदिवासींच्या पुढच्या पिढीचे भवितव्य घडविणाऱ्या आश्रमशाळा की छळछावण्या आहेत असा प्रश्न पडला आहे. नुकताच मोखाडा तालुक्यातील हिरवे पिंपळपाडा येथे एक 15 वर्षाच्या विद्यार्थ्याने आत्महत्येच्या संशयास्पद घटनेनंतर पुनः विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. आश्रमशाळेतील प्रत्येल मृत्यू हा “पोलीस कोठडीतील मृत्यू” असे गृहीत धरून राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. घटनांबाबत खुनाचे गुन्हे दाखल केल्याशिवाय कोवळ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाची किंमत यांना कळणार नाही असे मत विवेक पंडित यांनी व्यक्त केले. याबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पंडित यांनी केली आहे.

पालघर जिल्ह्यातील मोखाडामधील हिरवे पिंपळपाडा आश्रमशाळेत नववीत शिकणाऱ्या सुनिल चंदर खांडवी या १५ वर्षाच्या मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. पण सुनिलचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला. जांभूळमाथा इथं राहणाऱ्या सुनिल याचा मृतदेह मुलींच्या बाथरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. ही घटना रविवारी घडली आहे. यापुर्वीही अशा अनेक घटना घडून देखील याबाबत कोणत्याही कारवाईचे अथवा उपाययोजनेचे ठोस धोरण नाही.

पंडित यांनी सांगितले की, आश्रमशाळा विद्यार्थी हे अधिक्षक किंवा मुख्याध्यापक यांच्या ताब्यात म्हणजेच कायद्याच्या भाषेत कोठडीत असतात. त्यामुळे अशा घटना घडतात कोठडीतील मृत्यु बाबत मानवी हक्क आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून त्याच प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

  • मृत्यू झाल्यास 24 तासाच्या आत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला माहिती देण्यात यावी.
  • दुसरे म्हणजे कार्यकारी दंडाधिकारी यांच्या समक्ष प्रत्यक्ष जागेवर प्रेताचा पंचनामा केला जावा.
  • दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रेताचे शवविच्छेदन करावे.
  • या पुर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण करून ते मानवी हक्क आयोगाला पाठविण्यात यावे. आणि हे मृत्यू केवळ अनैसर्गिक मृत्यू न समजता हे कोठडीतील मृत्यु आणि संशयास्पद मृत्यू समजून मुख्याध्यापक, अधीक्षक किंवा अधिक्षिका यांच्यावर खुनाचे गुन्हे दाखल करावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे विवेक पंडित यांनी सांगितले.

राज्यात ५२९ शासकीय आश्रमशाळा असून त्यात सुमारे एक लाख ९१ हजार ५६१ विद्यार्थी आहेत, तर ५५६ अनुदानित आश्रमशाळांमध्ये दोन लाख ५३ हजार ८९१ विद्यार्थी आहेत. यामध्ये मुलींची संख्या निम्मी असून २००३ पासून २०१६ पर्यंत या आश्रमशाळांमधील १४१६ विद्यार्थ्यांचे सर्पदंश, आजारपण, आत्महत्येसह वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाले आहेत. यात आठ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.

मागील तीन वर्षांत शासकीय आश्रमशाळांमध्ये झालेल्या २८२ मृत्यूंची चिकित्सा केली. यात २८ टक्के मुलांच्या मृत्यूचे कारणच समजू शकले नाही असे त्यांनी नमूद केले आहे. २३ टक्के मुलांचा गंभीर आजाराने मृत्यू झाला, तर १२.६१ टक्के मुलांचा अचानक मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. ४.९२ टक्के विद्यार्थ्यांचा साप चावून मृत्यू झाला असून ४.२९ टक्के मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याचे दिसून येते.

सर्वत्र ही अशी भयावह परिस्थिती आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाची किंमत यांच्यालेखी काय आहे असा संतप्त सवाल पंडित यांनी केला. तातडीने याबाबत धोरण बनवावे अशी मागणी यावेळी पंडित यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here