हातावर क्वारंटाईनचा शिक्का, तरीही कृषि विद्यापिठाच्या ‘या’ जबाबदार व्यक्तींनी केले संतापजनक काम!

0
10950

मुंबई – योगेश चांदेकर

संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूबाबत काळजी घेतली जात असताना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा आणि अधिष्ठाता डॉ. ए. एल फरांदे यांनी मात्र बेजबाबदार पणाचा कळस करत सगळ्यांचीच झोप उडवलीय. त्यामुळे त्यांना जबरदस्तीने ‘डिटेंड’ करून आयसोलेशन वार्ड मध्ये ठेवण्यात आलयं. आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत ही बातमी पोहोचल्याने राज्यभर सोशल मिडीयावर देखील अशा जबाबदार पदावरील लोकांच्या बेजबाबदारपणाबद्दल मोठी चर्चा होऊ लागली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा आणि अधिष्ठाता डॉ. ए. एल फरांदे अमेरिकेत एका परिषदेला गेले होते. त्या परिषदेला उपस्थित राहून मंगळवारी ते परतले होते. कॉन्फरन्स अटेंड करून भारतात परतल्यावर त्यांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आले. असे असूनही या दोघांनी मुंबई ते पुणे आणि पुणे ते राहुरी असा प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी अनेकांच्या भेटीगाठीही घेतल्या. एव्हढेच नव्हे तर या दरम्यान विद्यापीठाच्या काही केंद्रावर परिषदेत सहभागी झाल्याबद्दल सत्कारही स्विकारले.

दरम्यान एअरपोर्ट ओथॅंरीटीकडून नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना या दोघांची ट्रॅव्हल्स हिस्ट्री पाठवण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार स्वतः जिल्हाधिकारी कुलगुरूंशी बोलले आणि सेल्फ क्वारंटाईन होण्याची विनंती केली. त्यावर कुलगुरूनी “मला काही झाले नाही, आणि होणारही नाही” असे उत्तर दिले. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून तहसीलदारांना आदेश देत कुलगुरू विश्वनाथा आणि डीन डॉ. फरांदे यांना डिटेंड करून राहुरीच्या आयसोलेशन वार्ड मध्ये ठेवले आहे.

अमेरिकेहून परतल्यानंतर कुलगुरू महोदयांनी दोन दिवस सर्व विद्यापीठांच्या कर्मचारी, विद्यार्थ्यांकडून ‘अमेरिका रिटर्न’ झाल्याबद्दल सत्कार स्वीकारले. त्याचबरोबर सर्व सहयोगी अधिष्ठाता यांची बैठक देखील घेतली. परंतु हे दोघेजण ज्या विमानाने दिल्लीपर्यंत आले त्या विमानांमधील एकजण कोरोना पॉझिटिव्हचा रुग्ण असल्याचेही स्पष्ट झाले आहे, त्यामुळे सर्वांचीच काळजी वाढली आहे. त्याचबरोबर या दोन्ही जबाबदार पदावरील व्यक्तींनी दाखवलेल्या बेजबाबदारपणाबद्दल चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here