पालघर: धक्कादायक, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेला कंपनीकडूनच ‘खोखो’!

0
698

पालघर – योगेश चांदेकर:

शेतकऱ्याचा अपघात झाल्यास त्याचे कुटुंब उद्‍ध्वस्त होऊ नये, त्यांना जीवन जगण्याचे पाठबळ मिळावे, यासाठी स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. मात्र योजनेचा जिल्ह्यात फज्जा उडत असून, वर्षभरात प्राप्त २७ अर्जांपैकी २२ अर्ज प्रलंबित ठेवत फक्त ५ अर्ज निकालात काढत, विमा कंपनीकडूनच या योजनेला ‘खो’ दिला जात आहे का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सर्वात महात्त्वाचे म्हणजे, कुटुंबाला पाठबळ मिळेल या अपेक्षेणे योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची मात्र, घोर निराशा योजनेतून होताना दिसत आहे.

दरम्यान पालघर जिल्ह्यातील भांदवे येथील अरविंद हरेश्वर पाटील यांचा शेतातील शेततलावावर काम करत असताना विजेच्या धक्क्याने ऑगस्ट २०१९ मध्ये अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या झालेल्या अपघाती निधनामुळे ९० वर्षीय वृद्ध वडील, आजारी आई, पत्नी आणि दोन मुले यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मृत्यू पावलेल्या शेतकरी पत्नीने स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळावा यासाठी नोव्हेंबर २०१९ मध्येच सर्व आवश्यक कागदपत्रे जमा केल्यानंतर वारंवार पाठपुरावा करून देखील त्यांना कोणतीच मदत मिळत नसल्याची माहिती मुंबई ई न्यूजकडे दिली होती.

मुंबई ई न्यूजचे पालघर प्रतिनिधी योगेश चांदेकर यांनी याबाबत खातरजमा करण्यासाठी काशिनाथ तरकसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यामध्ये तथ्य असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा कृषी विभागाने योजनेंतर्गत सहभागी झालेल्यांपैकी २७ प्रस्ताव सन २०१९ मध्ये विमा कंपनीकडे पाठविले होते. त्यांचेपैकी केवळ पाच प्रस्ताव मंजूर झाले असून, २२ प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत अशी माहिती दिली. प्रस्तावांतील त्रुटी दूर करण्यासाठी फेब्रुवारी २०२० मध्ये जिल्हास्तरीय मेळावा घेत कागदपत्रांची पूर्तता केल्याचेही त्यांनी सांगितले. जयका इंश्युरन्स ब्रोकरेज प्रायव्हेट लिमिटेड हे विमा कंपनीचे विमासल्लागार असून त्यांना येत्या महिन्याभरात सर्व प्रलंबित प्रस्ताव निकालात काढण्याबाबत पत्राद्वारे विनंती केली असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here