पालघर: अबब… लॉक डाऊनचा फायदा घेत त्यांनी रस्ताच चोरला..!

0
496

पालघर – योगेश चांदेकर:

दचकलात ना हेडिंग वाचून! अगदी अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या ‘कायद्याच बोला’ या सिनेमातील विहीर चोरीला गेल्याच्या युक्तिवादासारखाच प्रकार बांधकाम विभागातील अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारे नवा कोरा रस्ताच चोरण्याचे धाडस खुद्द जिल्हा परिषद बांधकाम सभापती काशिनाथ चौधरी यांच्याच मतदारसंघात केले आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की डहाणू तालुक्‍यातील रस्त्याचे काम सन २०१९-२० या वित्तिय वर्षात अंदाजित रक्‍कम रुपये 20.00 लक्ष इतकी निविदा मंजूर होऊन काम करण्याचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. रा. मा. 30 ते सोगवे पारसवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण कामाची दिनांक २९-०५-२०२० रोजी सभापती काशिनाथ चौधरी व उप अभियंता पंचायत समिती डहाणू प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता सदर रस्त्यावर कुठल्याही प्रकारे साहित्य अगर रस्त्याचे काम झालेले आढळून आले नाही. असे असताना देखील जाणीवपूर्वक ठेकेदाराला आर्थिक लाभ मिळण्यासाठी अधिकाऱ्यांनी धावते मुल्यांकन करुन देयक अदा केले आहे.

खुद्द सभापतींच्याच मतदारसंघात काम सुरू न होता अधिकारी देयक अदा करत असतील तर ही बाब गंभीर असून संबंधितावर कठोर कार्यवाही करावी तसेच अशा ठेकेदारांचा काळ्या यादीत समावेश करावा अशी मागणी काशिनाथ चौधरी यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणी देखील बांधकाम विभागामार्फत मोठ्याप्रमाणात कामे सुरू आहेत, नागरिकांनी जागरूक राहत निकृष्ट दर्जाचे काम होत असल्यास अथवा अन्य गैरप्रकार होत असल्यास मुंबई ई न्यूजशी 7276664464 या क्रमांकावर संपर्क साधावा.

“मी उप अभियंता पंचायत समिती डहाणू यांच्यासह सदर कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता त्या रस्त्यावर कुठल्याही प्रकारे साहित्य अगर रस्त्याचे काम झालेले आढळून आले नाही. याप्रकरणी चौकशीची मागणी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल तसेच ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात येईल.” – काशिनाथ चौधरी, बांधकाम सभापती जिल्हा परिषद पालघर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here