पालघर: तळीरामांना मिळाली सूट; गुटखा-तंबाखू प्रेमींची विक्रेत्यांकडून लुट!

0
669

पालघर – योगेश चांदेकर:

सध्या कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असल्यामुळे वाहतूक बंद आहे त्यामुळे जवळपास किरकोळ विक्रीतील सर्वच वस्तूंचे भाव थोडयाफार प्रमाणात वाढलेले दिसून आले आहे. सरकारने चढ्या दराने वस्तू विकणारांविरोधात धडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र लॉक डाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात दारू विक्री करण्यास परवानगी देत सरकारने तळीरामांना दिलासा दिला असला तरी गुटखाजन्य व तंबाखूजन्य वस्तूंची विक्री करण्यास अद्याप परवानगी नाही. यामुळे या वस्तूंचे भाव मात्र दारू पेक्षा जास्त महाग झाल्याचे चित्र ग्रामीण व शहरी भागात दिसून येत आहे.

पालघर जिल्ह्यात पानटपरी, पान मसाला व्यवसाय हा पूर्णपणे बंद आहे परंतु जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली किराणा दुकानामधून अवैध पद्धतीने अव्वाच्या सव्वा भावाने गुटखा व तंबाखू होलसेल विक्री ही चढ्या दराने विक्री करत आहेत. पोलीसांना कळवल्यास विक्रीच बंद होईल या भीतीपोटी अशा अवैधपणे व्यवसाय करून लूट करणाऱ्या व्यावसायिकांची तक्रार करण्यासाठी कोण पुढे येताना दिसत नाही.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारतर्फे विविध प्रयत्न केले जात आहेत. तरीही अनेक ठिकाणी तंबाखू, गुटखा व मद्याची बेकायदेशीर विक्री सुरूच आहे. काही ठिकाणी जीवनावश्‍यक वस्तू भेटणार नाही, पण तंबाखू, गुटखा उपलब्ध होईल, अशी स्थिती आहे. किराणामालाच्या दुकानांतून किंवा घरातून हा माल विकला जात आहे. संबंधित विक्रेता फोनवरून ऑर्डर घेत दहा रुपये किंमत असलेली तंबाखूची पुडी २५ ते ३० रुपयांपर्यंत, १५ रुपयांचा गुटखा ४० ते ५० रुपयांपर्यंत तर २५ चा गुटखा ६० ते ७० रुपयांपर्यंत विकला जात आहे. असे असले तरीही तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्ती इतक्या चढ्या दराने निमूटपणे खरेदी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here