पालघर – योगेश चांदेकर:
कोरोना विषाणूचा समूह संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अन्य मंत्रीगण देखील आढावा बैठक घेत असताना सोशल डिस्टंसिंगचा नियम काटेकोरपणे पाळताना दिसत आहेत. पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीच्या उपाय योजनांसाठी संचारबंदी कठोरपणे आमलात आणण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तलासरीच्या तहसीलदारांनी सोशल डिस्टंसिंगच्या आदेशाची पायमल्ली केल्याचे दिसून आले आहे.

लॉकडाउननंतर वाहतूक व्यवस्था बंद असल्याने परराज्यातील अनेक कामगार मूळ गावाकडे पायीच चालत निघाले आहेत. गुजरात राज्याच्या सीमा बंद असल्याने तिकडे जाणाऱ्या कामगारांना आहे तिथेच थांबण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. यानंतर पालघरच्या जिल्हा प्रशासनाने या स्थालांतर करणाऱ्या नागरिकांची हंगामी निवासाची व्यवस्था केली आहे. मात्र तलासरीच्या तहसीलदारांनी शासकीय गोदामांतून एक ना दोन तर तब्बल ५६ नागरिकांना रेशनिंग धान्याची वाहतूक करणाऱ्या एका वाहनांमध्ये बसवून डहाणू तालुक्यातील तवा आश्रमशाळेत हलविले.

यामुळे तहसीलदारांनीच सोशल डिस्टंसिंगच्या नियमाची पायमल्ली केल्याचा आरोप होऊ लागला आहे. या ५६ नागरिकांमध्ये दोन महिलांसह लहान मुलांचाही समावेश आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये ‘कुंपणानेच खाल्लं शेत’ अशी कुजबुज दबक्या आवाजात सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here