पुणे | महाराष्ट्रालाही यास चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या वादळाच्या परिणामामुळे आगामी दोन-तीन दिवसांत राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, नांदेड, लातूर अकोला, अमरावती, जालना या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

यास चक्रीवादळाने बिहारच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर त्याचे रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात झाले आहे. त्याचा प्रभाव हा शेजारच्या चार राज्यांवर जाणवणार आहे. यास चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भात येत्या 24 तासांत पावसाच्या हलक्या सरी आणि सोसाट्याचा वारा वाहू शकतो. काही दिवसांपूर्वीच अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण आणि गुजरात परिसरात प्रचंड नुकसान झालं होतं. हे चक्रीवादळ कोकण आणि मुंबई किनारपट्टीच्या भागातून गेल्यामुळे मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहताना पाहायला मिळाले होते.

दरम्यान, यास चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीलगत असणाऱ्या अनेक वस्त्यांमध्ये समुद्राचे पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. येथील दिघा परिसरात पाऊस नसूनही केवळ समुद्र खवळल्यामुळे आजुबाजूच्या वस्त्यांमध्ये पाणी वेगाने शिरत आहे. त्यामुळे लोकांची घरे आणि रस्त्यावरील गाड्या पाण्यात बुडाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here