पालघर: ती ३ वर्षीय मुलगी झाली कोरोनामुक्त; चिमुकलीच्या जिद्दीने प्रशासनाच्या मेहनतीने केली कोरोनावर मात..!

0
399

पालघर – योगेश चांदेकर:

डहाणू तालुक्यातील गंजाड दसरा पाडा येथील ३ वर्षीय मुलीला कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. या मुलीचे ७ व्या, १३ व्या आणि १४ व्या दिवशी घेण्यात आलेले स्वॅबचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तिच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने तिला आज घरी सोडण्यात आले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी सौरभ कटियार, तहसीलदार राहुल सारंग, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेंगणे, गटविकास अधिकारी भरक्षे, तालुका वैद्यकीय अधिकारी संदीप गाढेकर यांच्या उपस्थितांमध्ये तिला टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी हॉस्पिटल स्टाफ देखील उपस्थित होता. पालघर जिल्ह्यातील कोरोनामुक्त होणारी हि पहिलीच कोरोना रुग्ण आहे.

कोरोना रुग्ण सापडण्याअगोदर पासूनच कोरोनाला हरवण्यासाठी दिवस रात्र झुंजणाऱ्या प्रशासनातील योध्यांसाठी हि दिलासादायक बाब आहे. दरम्यान या चिमुकलीच्या संपर्कात आलेल्या डहाणू तालुक्यातील २२४ जणांपैकी ७ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर पालघर तालुक्यातील संपर्कात आलेल्या सर्व २८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते.

या ३ वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. कोरोनाशी दोन हात करत या मुलीने त्याच्यावर मात करण्यात यश मिळवले. उपस्थितांकडून टाळ्यांच्या गजरात उत्साहवर्धक वातावरणात तिला घरी सोडण्यात आले. पुष्प गुच्छ स्विकारत तसेच स्वतः देखील टाळ्या वाजवत चिमुकलीने सेवा देणाऱ्या आरोग्यदूतांचे आभार मानले.

  • “वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाने आणि त्यांनी दिलेल्या योग्य उपचाराने चिमुकली आज कोरोनामुक्त झाली आहे. तिला घरी सोडताना आज आनंद होतोय. या घटनेचा एक पॉजिटीव्ह परिणाम कोरोनाशी लढणाऱ्या लोकांवर होईल असा मला विश्वास आहे.” – सौरभ कटियार, सहाय्यक जिल्हाधिकारी
  • “त्या ३ वर्षीय चिमुकलीचे ७ व्या, १३ व्या आणि १४ व्या दिवशी घेण्यात आलेले स्वॅबचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने तसेच तिच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार तिला आज घरी सोडण्यात आले.” – राहुल सारंग, तहसीलदार डहाणू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here