पालघर : ‘या’ ठिकाणी कोरोना चाचणी कक्ष सुरु करावा – आ. वनगा

0
499

पालघर- योगेश चांदेकर:
संपूर्ण जगामध्ये आज कोवीड -१९ या गंभीर आजाराने थैमान घातले आहे. पालघर जिल्हा हा ग्रामीण आदिवासी बहूल भाग असून कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. सध्या जिल्ह्यात डहाणू येथे कोरोना चाचणी कक्ष सुरु करण्यात आला आहे. परंतु जिल्हयातील वाढती रुग्ण संख्या पाहता पालघर या जिल्हयाच्या मध्यवर्ती ठिकाणी कोरोना चाचणी कक्ष सुरु करणे आवश्यक आहे अशी मागणी पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

वनगा यांच्या या मागणीची मुख्यमंत्री कार्यालयाने त्वरित दखल घेत याबाबत लवकरच योग्य त्या कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासित केले आहे. तसेच या मागणीबाबत आरोग्य विभागास कळविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. पालघर या ठिकाणी कोरोना चाचणी कक्ष सुरु झाल्यास चाचणी अहवाल मिळण्यास होणारा विलंब कमी होईल परिणामी तात्काळ अहवाल प्राप्त झाल्याने आरोग्य विभागास पुढील कार्यवाही करणे देखील शक्य होईल. याचा फायदा कमी संसर्ग होण्यामध्ये तसेच संभाव्य संसर्ग टाळण्यास मदतच होईल. त्यामुळे कोरोनाशी सुरु लढाईमध्ये तात्काळ चाचणी अहवाल मिळणे महत्वाचे असले कारणाने नागरिकांकडून आमदार वनगा यांचे या मागणीबद्दल कौतुक करण्यात येत आहे. राज्यसरकारने कोरोना चाचणी कक्ष सुरु केल्यास कोरोनाच्या लढाईत मदतच होणार आहे.

“कोरोना संशयित रुग्णांचे चाचणी अहवाल लवकर प्राप्त झाल्यास संपर्कात येणाऱ्या लोकांना संसर्ग होण्यापासून रोखता येऊ शकते. तसेच निगेटिव्ह अहवाल येणाऱ्या रुग्णांना केवळ अलगीकरण करण्यात येता येईल यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणदेखील कमी होण्यास मदत होईल. सरकारकडे याबद्दल मागणी केली असून लवकरच यावर सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे.” – आमदार श्रीनिवास वनगा (पालघर विधानसभा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here