पालघर: ‘त्या’ शिक्षकांच्या बदल्यांच्या चौकशीची मागणी..!

0
530

पालघर – योगेश चांदेकर:

गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या झाल्या आहेत, यामध्ये मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीने बदली देण्याचे काम झाल्याची माहिती मुंबई ई न्यूजकडे आली आहे. या बदल्या करत असताना अवघड आणि सुलभ क्षेत्र अशी वर्गवारी केली होती. नियमानुसार अवघड म्हणजेच दुर्गम भागात सेवेची ३ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकाला सोयीनुसार २० शाळांमधून एक शाळा निवडण्याची मुभा देण्यात आली होती.

सुलभ म्हणजे शहरी भागांतील बदलीसाठी सेवेची १० वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकाला जिल्हा स्तरावर कोणत्याही ठिकाणी बदली करण्याची मुभा देण्यात आली होती. यापूर्वी शासनाच्या निर्णयानुसार १० टक्के बदली होत होती ती बंधने नव्या धोरणामध्ये नव्हती. तसेच बदली देत असताना ती ३० किमी परिघात झाली पाहिजे, असाही शासननिर्णय होता. एकूणच पारदर्शक पद्धतीने तसेच कुणावर अन्याय न होता बदल्या व्हाव्यात हा यामागचा उद्देश होता. असे असताना देखील पालघर जिल्ह्यात बदली देत असताना मोठी अनियमितता झाल्याची माहिती मुंबई ई न्यूजला मिळाली आहे.

इच्छित ठिकाणी बदली मिळवण्यासाठी अनेकांनी खोटी माहिती जोडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये संवर्ग १ या अंतर्गत बदली मिळण्यासाठी मोठी अनियमितता झाली आहे. काहींनी आरोग्यविषयक कारणे देत तर काहींनी अवघड क्षेत्रात सेवा दिल्याचे सांगत बदली मिळवली असल्याचे समजते आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या प्रकरणाची समिती नेमून चौकशी करण्याची गरज आहे तरच यातील सत्य बाहेर येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here