पालघर: निकृष्ट दर्जाच्या कामाकडे शाखा अभियंत्याची डोळेझाक; काँक्रीटमध्ये फक्त दगडांचाच थर..!

0
492

पालघर – योगेश चांदेकर:

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील तवा या गावी करवीर रिसॉर्टजवळ असलेल्या नाल्यावर गट नं. १५७ ला लागून एका साकावचे काम सुरु आहे. सदर कामाचा दर्जा हा अतिशय निकृष्ट असून शाखा अभियंता जिल्हा परिषद डहाणू वैभव चौधरी यांनी काम सुरु झाल्यापासून एकदाही या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली नसल्याचा आरोप समाजमित्र मानवविकास संघटन, महाराष्ट्र् राज्य कार्याध्यक्ष विजय वझे यांनी केला आहे.

साकावचे (पूल) काम शाखा अभियंत्यांच्या गैरहजेरीत चालू असून ते बांधकामाचे निकष न पाळता केले जात आहे. तसेच मागील सुमारे पंधरा दिवस काम सुरु असून सुध्दा शाखा अभियंत्यांनी एकदा सुध्दा कामावर भेट दिली नसल्याचा गौप्यस्फोट ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी वारंवार फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोनला उत्तर दिले जात नाही असा आरोप देखील करण्यात येत आहे.

सदर साकाव कामाच्या प्रत्येक दिवसाचे व्हिडीओ शूटिंग मुंबई ई न्यूजच्या हाती लागले असून काँक्रीट करत असताना स्लॅबमध्ये पूर्णतः दगडांचा थर देऊन काम केले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे आहे आणि या कामामध्ये कॉन्ट्रॅक्टर व शाखा अभियंता यांचे संगनमताने भ्रष्टाचार झाला असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून होतो आहे. त्यामुळे शाखा अभियंत्यांनी कामाच्या ठिकाणी भेट का दिली नाही? त्यांनी प्रत्यक्ष कामाचा आढावा घेतला आहे का? कामाच्या दर्जाबाबत ते जबाबदारी घेणार का? भविष्यात निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने सदर साकाव ठिकाणी दुर्घटनाघडल्यास जबाबदार कोण? असे एक ना अनेक प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची बांधकाम विभागाने तात्काळ चौकशी करावी व दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता पुढे येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here